कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात मिळत नाहीत सुविधा; 'आप'चा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 02:27 PM2018-03-05T14:27:32+5:302018-03-05T14:27:32+5:30
सामान्य जनतेच्या आरोग्याच्या आधार असलेल्या या रुग्णालयात नागरिकांनी पुरेशा आरोग्य सेवा मिळत नाहीत.
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दोन मोठय़ा रुग्णालयासह नागरी आरोग्य केंद्रात नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नाही. या प्रकरणी 'आम आदमी पार्टी'तर्फे (आप) वारंवार महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुन प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने 'आप'च्या शिष्टमंडळाने आज सोमवारी महापालिका मुख्यालयात धडक दिली. मात्र, त्यांना आयुक्त व आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट नाकारली. यावेळी त्यांना वैद्यकीय अधिकारी बुधवारी भेटणार असल्याचे सांगण्यात आले.
'आप'चे रवी केदारे, राजू शेलार, सागर खाडे, निलेश व्यवहारे, गणेश आव्हाड, रुपेश चौहान, विनोद जाधव, सचिन जोशी आणि शफीक शेख यांनी मुख्यालयात धाव घेतली. महापालिकेचे कल्याण येथे रुक्मीणीबाई रुग्णालय व डोंबिवली येथे शास्त्रीनगर रुग्णालय ही दोन बडी रुग्णालये आहे. सामान्य जनतेच्या आरोग्याच्या आधार असलेल्या या रुग्णालयात नागरिकांनी पुरेशा आरोग्य सेवा मिळत नाहीत. याशिवाय महापालिकेची 13 ठिकाणी नागरी आरोग्य केंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रात साध्या उपचाराची औषधेही उपलब्ध नसतात. महापालिकेच्या आस्थपना सूचीवर डॉक्टर व इतर पॅरा मेडिकल स्टॉफची मंजूर पदे आहेत. त्यापैकी असंख्य पदे रिक्त आहे. विशेषज्ज्ञ डॉक्टरांची वाणवा आहे. रुग्णालयात आयसीयू, सिटी स्कॅन, सोनोग्राफी यासारख्या सुविधा दिल्या जात नाही. महापालिका दोन्ही रुग्णालयावर वर्षाला 30 कोटी रुपयांचा खर्च करते. त्यापैकी 17 कोटी रुपयांचा खर्च आस्थापनेवर होते. उर्वरीत 13 कोटी रुपये नागरीकांच्या आरोग्यावर खर्च होतात. 3 कोटी रुपये खर्च करुन पुरेशा आरोग्य सेवा मिळत नसल्याविषयी 'आप'चे दीपक दुबे यांनी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरु ठेवला आहे. त्यांनी माहितीच्या अधिकारात आरोग्य सेवेची माहिती काढली आहे. त्यांच्या पाठपुराव्या पश्चात आरोग्य सेवेत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीने आज आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यासाठी आयुक्तांच्या भेटीची वेळ आधी घ्यावी लागेल, असे आयुक्त कार्यालयातून शिष्टमंडळास सांगण्यात आले. बुधवारी भेटीसाठी या मग चर्चा करु असे आश्वासन 'आप'ला देण्यात आले.