केडीएमसीचे कनिष्ठ अभियंते, खासगी प्लंबर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:49 AM2021-09-08T04:49:02+5:302021-09-08T04:49:02+5:30

डोंबिवली : बांधकामावरील कारवाई टाळण्यासाठी लाखो रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली केडीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याच्या घटनेला २४ ...

KDMC Junior Engineer, Private Plumber Gajaad | केडीएमसीचे कनिष्ठ अभियंते, खासगी प्लंबर गजाआड

केडीएमसीचे कनिष्ठ अभियंते, खासगी प्लंबर गजाआड

Next

डोंबिवली : बांधकामावरील कारवाई टाळण्यासाठी लाखो रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली केडीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याच्या घटनेला २४ तास उलटले नसताना वर्कऑर्डर काढण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मनपा पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज आणि खासगी प्लंबर रवींद्र डायरे यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात सापळा लावून अटक केली.

तक्रारदार हे प्लंबिंगची कामे करतात. एका व्यक्तीने त्यांच्याकडे नवीन घरासाठी पिण्याच्या पाण्याची नवीन नळजोडणी महापालिकेकडून मंजूर करून देण्याचे काम दिले होते. त्याप्रमाणे केडीएमसीचे ‘फ’ आणि ‘ग’ प्रभागातील पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता वाळंज यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. वाळंज यांनी ही रक्कम डायरे याच्याकडे देण्यास सांगितले होते. त्यानुसार डायरे यांनी रोकड स्वीकारली असता दोघांनाही लाच घेतल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक विलास मते यांच्या पथकाने अटक केली.

मनपात लाचखोरीची प्रकरणे सातत्याने घडत आहेत. त्यात सोमवारी लाखो रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली दोघा अधिकाऱ्यांची आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी चौकशी सुरू केली आहे. हा प्रकार ताजा असतानाच कनिष्ठ अभियंत्यांना लाचप्रकरणी अटक झाल्याने मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारण्याची लागलेली ‘लत’ काही केल्या संपत नाही हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

---------------------------------------

Web Title: KDMC Junior Engineer, Private Plumber Gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.