केडीएमसीने आम्हाला सोडले वाऱ्यावर; ‘एनयूएचएम’तील कर्मचाऱ्यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:42 AM2020-06-30T00:42:30+5:302020-06-30T00:42:38+5:30
अल्प वेतनावर राबवून घेत असल्याकडे वेधले लक्ष
कल्याण : कोविडशी सामना करण्यासाठी केडीएमसीने नर्स व डॉक्टरांची भरती सुरू केली आहे. मात्र, ‘नॅशनल अर्बन हेल्थ मिशन’मधील (एनयूएचएम) नर्स, तंत्रज्ञ अशा १९२ जणांना अत्यंत कमी वेतनावर २०१५ पासून राबवून घेतले जात आहे. तसेच पुरेशा सोयीसुविधा दिल्या जात नसल्याने त्यांनी सोमवारी सायंकाळी महापालिका मुख्यालय गाठून प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. केडीएमसीने आम्हाला वाºयावर सोडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, या सगळ्या आरोपांविषयी प्रशासनाने मौन धारण केले आहे.
एनयूएचएमअंतर्गत १९२ जण कार्यरत आहेत. त्यात नर्स व वैद्यकीय सेवेशी संबंधित तंत्रज्ञही आहेत. महापालिका त्यांना दरमहिन्याला आठ हजार ६४० रुपये वेतन देते. हे वेतन महापालिकेस सरकारकडून प्राप्त होते. कोविडशी मुकाबला करण्यासाठी केडीएमसीने नर्स, तंत्रज्ञ, वॉर्डबॉय, डॉक्टरची भरती सुरू केली आहे. त्यातील डॉक्टरांना तर ६५ हजार ते दोन लाखांपर्यंत पगार देण्याची हमी दिली आहे. तसेच कोविडपुरतेच घेतल्या जाणाºया नर्सना १७ ते ३० हजार रुपयांदरम्यान पगार दिला जाणार आहे.
मात्र, एनयूएचएममधील १९२ जण आधीपासून कार्यरत आहेत. ते कोविडकाळात रुग्णभरती, रुग्ण इतरत्र हलविणे, सर्वेक्षण करणे, बाह्यरुग्ण कक्ष सांभाळणे अशी कामे करत आहेत. त्यादरम्यान, त्यांचा कोविड रुग्णांशी संपर्क येत आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करीत असताना नव्या भरती झालेल्या नर्सला २५ हजार, तर आम्हाला आठ हजार ६४० रुपये पगार, हा कुठला न्याय आहे, असा संतप्त सवाल या नर्सनी केला आहे.
आमच्या वेतनावर किमान खर्च होत आहे, तोही सरकारच्या तिजोरीतून. मात्र, महापालिका नव्या भरतीवर १४ कोटी रुपये खर्च करणार आहे. महापालिकेने आम्हाला किमान वेतन द्यावे. अन्य महापालिकांमध्ये एनयूएचएमच्या कर्मचाºयांना २५ हजार किमान वेतन दिले जात आहे. कोविडकाळात नर्स व अन्य पॅरामेडिकल स्टाफला वैद्यकीय भत्ताही दिला जात आहे. तोही येथे आम्हाला मिळत नाही. त्याचबरोबर वैद्यकीय सुरक्षा पुरविली जात नाही. आमच्यापैकी कोणाला ताप, सर्दी, खोकला झाला तर ‘टाटा आमंत्र’ येथे पाठविले जाते. मात्र, अन्य डॉक्टर आणि नर्सला खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहे, असे या नर्सनी प्रसार माध्यमांना सांगितले.
सुटी घेतल्यास कारवाईची धमकी
कमी पगारावर आमचा व आमच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून काम केले. रविवारची सुटीही प्रशासन घेऊ देत नाही. सुटी घेतल्यास कारवाईची धमकी दिली जाते. कोणाच्या सांगण्यावरून सुटी घेतली, असा जाब विचारला जातो. दरम्यान, आयुक्तांना भेटण्यासाठी या नर्स महापालिकेत रात्री ८ वाजेपर्यंत थांबल्या होत्या. मात्र, ते एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये व्यस्त असल्याने त्यांच्याशी भेट होऊ शकलेली नव्हती.