आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या : केडीएमसीवर दिली दमदार धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 03:37 AM2019-02-06T03:37:24+5:302019-02-06T03:37:55+5:30

केडीएमसीच्या रिंगरोड प्रकल्पात आटाळी-आंबिवली परिसरातील ८४२ जणांची घरे बाधित होत आहेत.

KDMC news | आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या : केडीएमसीवर दिली दमदार धडक

आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या : केडीएमसीवर दिली दमदार धडक

Next

कल्याण : केडीएमसीच्या रिंगरोड प्रकल्पात आटाळी-आंबिवली परिसरातील ८४२ जणांची घरे बाधित होत आहेत. या प्रकल्पबाधितांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्या नेतृत्वाखाली मंगळवारी केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला.
रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी जालिंदर बर्वे, दयार बहाद्दूरे, महेंद्र गायकवाड, अण्णा रोकडे, भीमराव डोळस, महेश वरेकर, दिनेश जाधव, अशोक खैरे, रमेश बर्वे, सुवर्णा पाटील यांच्यासह शेकडो महिला-पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यापासून काढलेला मोर्चा महापालिका मुख्यालयावर धडकला. त्यापूर्वी बारावे हिल रोड संस्थेचा बारावे कचरा प्रकल्पाविरोधातील मोर्चा धडकल्याने रिपब्लिकन पक्षाचा मोर्चा आंबेडकर उद्यानात पोलिसांनी थोपवून ठेवला होता.
आटाळी-आंबिवली परिसरातील ८४२ जण रिंगरोड प्रकल्पात बाधित होत आहेत. महापालिकेने रस्ते विकासाचे सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते प्रकल्पबाधितांनी हाणून पाडले होते. त्यानंतर चर्चा केली जाईल, असे प्रकल्पबाधितांना प्रशासनाने सांगितले होते. त्यानंतर प्रकल्प बाधितांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांची १५ जानेवारीला भेट घेतली होती. त्यावेळी आयुक्तांसोबत समाधानकारक चर्चा न झाल्याने प्रकल्प बाधितांनी मंगळवारी मोर्चा काढला.
रिंगरोडमध्ये बाधित होणारे चाळीत राहत आहेत. कर्ज काढून त्यांनी चाळीत घरे घेतली आहेत. चाळीतील घरे ज्या बिल्डर व जमीनमालकांनी विकसित केली त्यांना महापालिकेने पुनर्वसनाचा लाभ देऊ नये. त्याचा फायदा बाधित चाळकऱ्यांना होणार नाही. अशा प्रकारच्या पुनर्वसनामुळे चाळकरी बेघर होतील, याकडे मोर्चेकºयांनी लक्ष वेधले आहे. पुनर्वसन झाल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू करू दिले जाणार नाही, असा इशारा मोर्चेकºयांनी प्रशासनाला दिला आहे.

पुनर्वसन होईपर्यंत घरे रिकामी करू नका
मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. बाधितांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत त्यांनी घरे रिकामी करू नयेत, असे यावेळी आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती जालिंदर बर्वे यांनी दिली.

बारावे कचरा प्रकल्पाविरोधात आक्रोश, २५ आंदोलक ताब्यात


कल्याण : केडीएमसी बारावे येथे शास्त्रोक्त भरावभूमी कचरा प्रकल्प उभारणार आहे. परंतु, हा प्रकल्प नागरी वस्तीलगत असल्याने त्याविरोधात बारावे हिल रोड संस्थेच्या पुढाकारने शेकडो नागरिकांनी मंगळवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी २५ जणांना ताब्यात घेतले.
बारावे प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेनजीक ५२ निवासी सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमध्ये सात हजार फ्लॅट धारक आहे. जवळपास २५ हजार नागरिकांना या प्रकल्पामुळे त्रास होणार असून, त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल संकुलापासून महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यात बारावे हिल रोड संस्थेचे पदाधिकारी सुनील घेगडे, सचिन शेट्टी, अरुण नायर, राहूल सूर्यवंशी, तुषार बंदोपाध्याय, भरत मिरकुटे आदी महिला पुरुष आणि शाळकरी मुले सहभागी झाली होती. मनसेने या मोर्चाला पाठिंबा दिला. मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर आणि महिला आघाडीच्या उर्मिला तांबे या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. गोदरेज हिल परिसरातील दुकानदारांनीही दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला.
मोर्चा महापालिका मुख्यालयाजवळ येताच मोर्चेकºयांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चा मुख्यालयाजवळ अडवण्यात आला. केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी सुरुवातीला शिष्टमंडळाला भेट नाकारल्याने त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेरच ठिय्या धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर शिष्टमंडळ त्यांना भेटले. आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रिकेनुसार बारावे घनकचरा प्रकल्प निकषांच्या आधारे राबविला जात नसल्याचा मुद्दा मांडला. मात्र, हा मुद्दा आयुक्तांनी ऐकून घेतला नाही. येत्या दोन दिवसांत स्थळपाहणी करून काय ते सांगतो, असे आश्वासन दिले.
शिष्टमंडळातील घेगडे यांनी सांगितले की, मोर्चा मागे घेण्यासाठी पोलिसांनी शिष्टमंडळावर दबाव टाकला. मात्र, तरीही शिष्टमंडळ ऐकत नसल्याचे पाहून शिष्टमंडळातील पदाधिकारी व बाहेरचे काही मोर्चेकरी, असे मिळून २५ जणांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले.

मतदानावर बहिष्कार टाकू शकता - आयुक्त

कचरा प्रकल्पावर आपली बाजू आयुक्त ऐकून घेत नसल्याचे पाहून शिष्टमंडळाने आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. त्यावर आयुक्तांनी तो तुमचा निर्णय आहे, तुम्ही तो घेऊ शकता, असे सांगितले.

आयुक्तांनी सकारात्मक चर्चा न केल्याने शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त करीत आयुक्तांच्या दालनाबाहेर पुन्हा ठिय्या देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना पोलिसांनी मज्जाव केला.

Web Title: KDMC news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.