केडीएमसी अधिकाऱ्याच्या दुर्लक्षाचा प्रताप; फुटपाथवर गतिरोधक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 09:35 AM2019-08-02T09:35:08+5:302019-08-02T09:35:24+5:30
या तुटलेल्या झाकणाच्या ठिकाणी नवीन प्लास्टिक झाकण बसवणे गरजेचे होते पण तेथे सिमेंटचे झाकण बसवून फुटपाथ वर सुमारे ६ इंच जास्त वर बांधण्यात आले आहे
डोंबिवली: केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे थेट फुटपाथ वर गतिरोधक तयार करून लोकांच्या चालण्याच्या वेगावर नियंत्रण मिळविल्याची उपरोधिक टीका नागरिकांमधून होत आहे. शहरातील मानपाडा रोडवरील शिवमार्केट प्रभागात शिवमार्केट गेट जवळ फुटपाथवरील प्लास्टिकच एक झाकण तुटले होते. या फुटपाथ वरून रोज हजारो नागरिक ये जा करत असून ह्या रोडचे फुटपाथ डोंबिवलीकर चालण्यासाठी सर्वात जास्त वापरत असतात.
या तुटलेल्या झाकणाच्या ठिकाणी नवीन प्लास्टिक झाकण बसवणे गरजेचे होते पण तेथे सिमेंटचे झाकण बसवून फुटपाथ वर सुमारे ६ इंच जास्त वर बांधण्यात आले आहे. या झाकणामुळे गुरुवारी एका दिवसात पाच ते सहा जण पाय अडखळून पडले आहेत. नागरिकांनी शिवसेना शाखेत शाखा प्रमुख संदीप नाईक यांच्याकडे या बाबत तक्रारी केल्या असून त्या सिमेंट झाकणांच्या गतिरोधकाच्या जागी प्लास्टिक झाकण बसवावे ही विनंती केली आहे.
या बाबत बांधकाम विभाग व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना पत्राद्वारे कळवले असून लवकरात लवकर हे सिमेंटचे झाकण काढून व्यवस्थित बसवण्याची मागणी त्यांनी केली आहे. तो पर्यंत तमाम डोंबिवली करांनी या ठिकाणाहून चालताना काळजी घ्यावी असे आवाहन नाईक यांनी केले आहे.