केडीएमसीचे दोन प्राणवायू निर्मिती प्रकल्प कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:47 AM2021-09-09T04:47:48+5:302021-09-09T04:47:48+5:30
कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला होता. आता तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून कोरोना रुग्णांना ...
कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला होता. आता तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून कोरोना रुग्णांना प्राणवायूचा तुटवडा भासू नये, यासाठी पाच प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे काम कल्याण-डोंबिवली मनपाने हाती घेतले आहे. यापैकी दोन प्राणवायू प्रकल्प मंगळवारपासून कार्यान्वित झाले आहेत. त्याचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूचा तुटवडा भासला असताना केडीएमसीला राज्य सरकारकडून ५० टन प्राणवायू दिला जात होता. मात्र, रुग्णांची संख्या जास्त असल्याने प्राणवायूच्या खाटा उपलब्ध होत नव्हत्या. त्यावेळी मनपाची सात कोविड रुग्णालये व त्यातील प्राणवायू प्रकल्पाची गरज लक्षात घेऊन प्राणवायू प्रकल्प उभारण्याचा विचार पुढा आला. मे महिन्यात प्रकल्प कार्यान्वित सुरू होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, त्याला विलंब झाला. हा प्रकल्प उभारण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने एक कोटी ६८ लाख रुपये मंजूर केले. तर, मनपाने ३४ लाख रुपये खर्च केले आहेत.
पीएसए तंत्रज्ञानाच्या आधारे रुक्मिणीबाई रुग्णालयात ९६० लीटर क्षमतेचा प्राणवायू प्रकल्प उभारला आहे. १०० खाटांना त्याचा पुरवठा केला जाणार आहे. प्रतिदिन २०० ते २२५ जंबो प्राणवायू सिलिंडरचे उत्पादन या प्रकल्पातून केले जाणार आहे. सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील कोविड रुग्णालयात ८५० लीटर क्षमतेचा प्राणवायू प्रकल्प कार्यान्वित केला आहे. तेथून ७५ खाटांना प्राणवायूचा पुरवठा केला जाणार आहे. प्रतिदिन १७५ जम्बो प्राणवायू सिलिंडरचे उत्पादन केले जाणार आहे. उर्वरित तीन प्राणवायू प्रकल्प विठ्ठलवाडी, शक्तीधाम आणि आर्ट गॅलरी येथे उभारण्याचे काम सुरू आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने सध्या जिमखाना, सावळाराम महाराज क्रीडा संकुल आणि आर्ट गॅलरी ही कोविड रुग्णालये सुरू आहेत. तेथे कमी प्रमाणात प्राणवायूही लागत आहे. तिसरी लाट आल्यास या दोन्ही प्रकल्पांतून उत्पादित होणाऱ्या प्राणवायूमुळे लाटेवर मात करण्यासाठी दिलासा मिळू शकतो, असा विश्वास मनपाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.
अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह
मनपाच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह सुरू करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीने त्यासाठी दोन कोट ७० लाखांचा निधी मंजूर केला होता. या दोन्ही शस्त्रक्रिया गृहात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनल मार्फत केल्या जाणार आहेत. पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केली जाईल. पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना मनपाच्या मंजूर दरानुसार शस्त्रक्रिया करता येईल.
-------------