केडीएमसीची मोबाइल लसीकरणाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:09+5:302021-07-01T04:27:09+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाने मोबाइल लसीकरणाची तयारी केली असून, त्यासाठी राज्य सरकारकडे सहा लाख डोसची मागणी केली असल्याची माहिती ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाने मोबाइल लसीकरणाची तयारी केली असून, त्यासाठी राज्य सरकारकडे सहा लाख डोसची मागणी केली असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली आहे.
मनपा हद्दीत झोपडपट्टी, चाळवजा परिसरात दोन व्हॅन फिरत्या स्वरूपात लसीकरण करण्यासाठी सज्ज केल्या जाणार आहेत. एका व्हॅनमध्ये लसीकरण केले जाईल. तर, दुसऱ्या व्हॅनमध्ये लस दिलेल्यास निरीक्षणाखाली ठेवले जाईल. त्यासाठी दिवसाला २० हजार लसींचे डोस लागलीत. राज्य सरकारने ६ लाख लसींचे डोस दिल्यास मोबाइल लसीकरण मनपाला सुरू करणे शक्य होईल. त्याचा आराखडा व नियोजन मनपाने केले आहे.
दरम्यान, मनपास दररोज १२ ते १५ हजार लसींचे डोस उपलब्ध होत होते. सोमवारी ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने लसीकरण सुरू होते. अत्रे रंगमंदिरातील लसीकरण केंद्रावर सोमवारी गर्दी झाल्याने गोंधळ उडाला होता. मात्र, पुरेसे डोस उपलब्ध न झाल्याने लसीकरण मंगळवार ते गुरुवारपर्यंत बंद आहे. लसी उपलब्ध होताच लसीकरण सुरू केले जाईल. लसीकरण जास्त प्रमाणात व्हावे, यासाठी मनपाने ३३ खासगी मान्यताप्राप्त रुग्णालयांकडून मोठ्या सोसायट्यांनी त्यांच्या सभासदांचे सशुल्क लसीकरण करून घ्यावे, असे धोरण जाहीर केले होते. परंतु, केवळ पलावा येथील सोसायटीने रिलायन्स रुग्णालयाशी टायअप करून तीन हजार जणांचे लसीकरण केले. लसीचे डोस संपल्याने तेथील लसीकरणही सध्या बंद आहे. तर, अन्य सोसायट्या लसीकरणासाठी पुढे आलेल्या नाहीत. दरम्यान, कल्याण पश्चिमेत खासदार कपिल पाटील फाउंंडेशनने लसीकरण सुरू केले. त्यासाठी फाउंडेशनने लसीचे डोस विकत घेतले होते.
लस खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द
राज्य सरकारकडून लसीचे पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने केडीएमसी दोन लाख लस खरेदी करणार होती. त्यासाठी मनपाने राष्ट्रीय स्तरावरील निविदा काढली होती. त्याकरिता आठ कोटींचा खर्च होणार होता. मात्र, तीनदा निविदा मागवूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लस खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोबाइल लसीकरणाची प्रक्रिया प्रत्यक्षात येणार का, असा प्रश्न केला जात आहे.
-------------