रेल्वे पास देण्यासाठी केडीएमसीची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:45 AM2021-08-12T04:45:17+5:302021-08-12T04:45:17+5:30
कल्याण : काेराेना लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याच्या शासनाच्या सूचनांनुसार मंगळवारी ...
कल्याण : काेराेना लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याच्या शासनाच्या सूचनांनुसार मंगळवारी आयुक्तांच्या दालनात आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या अधिपत्याखाली मनपा अधिकारी, पोलीस अधिकारी, एसआरपीएफ, सीआरपीएफ, रेल्वे अधिकारी यांच्यासमवेत ऑनलाइन बैठक झाली. त्यात नागरिकांना १५ ऑगस्टपासून रेल्वे पास देण्याबाबत रेल्वेव्यतिरिक्त इतर विभागांनी करावयाच्या कामांबाबत ऊहापोह करण्यात आला.
कोरोनाच्या दोन लस घेऊन १४ दिवस झालेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून रेल्वेच्या तिकीट काउंटरवर रेल्वे पास दिला जाणार आहे. त्या वेळी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी व पासचे वितरण जलदगतीने व्हावे, यासाठी प्रत्येक तिकीट काउंटरजवळ सकाळी ७ ते दुपारी ३ व दुपारी ३ ते रात्री ११ अशा दोन शिफ्टमध्ये मनपा कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र मदत कक्ष उभारले जाणार आहेत.
नागरिकांना पाससाठी लसीकरण प्रमाणपत्राची एक प्रत व फोटो असणारे मूळ शासकीय ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत (प्राधान्याने आधार कार्ड) आणावी लागणार आहे. प्रथम मनपाच्या मदत कक्षांमध्ये कर्मचारी या कागदपत्रांची पडताळणी करतील. त्यानंतर त्यावर पडताळणी (व्हेरिफाइड) केल्याचा शिक्का मारून दिनांकासह स्वाक्षरी करतील. मग, ती कागदपत्रे रेल्वेच्या तिकीट काउंटरवर दाखवून नागरिकांना पास घेता येईल.
मनपा हद्दीतील टिटवाळा, ठाकुर्ली, डोंबिवली, कल्याण, आंबिवली व शहाड रेल्वे स्थानकांतील तिकीट काउंटरवर लसीकरण प्रमाणपत्र व फोटो असणाऱ्या ओळखपत्राच्या (आधार कार्ड) पडताळणीसाठी मनपा कर्मचारी तैनात केले जातील. पाससाठी रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये, यासाठी रेल्वेच्या आगमन आणि बहिर्गमन मार्गावर गर्दीवर नियंत्रणासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. तर, तिकीट काउंटरवर रेल्वे पोलिसांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
प्रवासात कागदपत्रे बाळगणे बंधनकारक
नागरिकांनी प्रवासात रेल्वेचा पास, लसीकरण प्रमाणपत्र आणि ओळखपत्राची प्रत जवळ बाळगणे अनिवार्य आहे. राज्य शासनाची नागरिकांसाठी युनिव्हर्सल पासबाबत ऑनलाइन सेवा कार्यान्वित झाल्यानंतर नागरिक स्वत:चा युनिव्हर्सल पास घेऊ शकतील. अशा नागरिकांना प्रवासात रेल्वेचा पास आणि युनिव्हर्सल ऑनलाइन पास जवळ बाळगणे अनिवार्य राहील.
---------------