केडीएमसीला मिळाल्या नऊ रुग्णवाहिका; खासदारांच्या फाउंडेशनचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 12:40 AM2020-08-28T00:40:46+5:302020-08-28T00:41:01+5:30
कोरोनाच्या रुग्णांना मिळणार दिलासा
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनने गुरुवारी नऊ रुग्णवाहिका दिल्या आहेत. त्यामुळे मनपाकडे आता १५ रुग्णवाहिका झाल्याने रुग्णांची गैरसोय होणार नाही, असा दावा मनपा प्रशासनाने केला आहे.
कोरोनाच्या काळात रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी मनपाकडे अवघ्या सहा रुग्णवाहिका होत्या. त्यामुळे अनेक रुग्णांना खाजगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागत होता. खाजगी रुग्णवाहिकांचे दर ठरवलेले असताना रुग्णांकडून जास्तीचे भाडे आकारण्यात येत होते. त्याला आळा घालण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जवळपास १०० रुग्णवाहिका भाड्याने घेऊन त्या रुग्णांना दिल्या जातील, असे स्पष्ट केले होते. मनपा हद्दीत जुलैमध्ये कोरोना रुग्ण वाढले. तोपर्यंत मनपाने जवळपास ८० रुग्णवाहिका भाड्याने घेतल्या. या रुग्णवाहिका आजही कार्यरत आहेत.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे फाउंडेशनतर्फे महापालिकेस रुग्णवाहिका दिल्या जातील, असे जाहीर करण्यात आले होते. २४ जुलैला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे ठाण्याला आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या नऊ रुग्णवाहिका सूर्यवंशी व महापौर विनीता राणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्यामुळे मनपाकडे भाड्याने घेतलेल्या ८०, स्वत:कडील सहा आणि आता नव्याने मिळालेल्या नऊ अशा एकूण ९५ रुग्णवाहिका झाल्या आहेत. दरम्यान, एकूण रुग्णवाहिकांपैकी एक कार्डिअॅक आहे.
कंत्राटी चालकांची करणार भरती - रामदास कोकरे
सध्या मनपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांची मागणीही कमी झाली आहे. परिणामी, मनपाने भाड्याने घेतलेल्या रुग्णवाहिकाही कमी केल्या जाणार आहेत. नवीन नऊ रुग्णवाहिकांसाठी पुरेसे चालक नाहीत. त्यामुळे या रुग्णवाहिका एक शिफ्टमध्ये चालविल्या जाणार आहेत. उर्वरित दोन शिफ्टमध्येही त्या चालवण्यासाठी पुरेसे चालक कंत्राटी पद्धतीने भरले जातील. या रुग्णवाहिकांचाच पुरेपूर वापर केला जाईल, अशी माहिती उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली आहे.