आयुक्तांच्या सहीअभावी रखडली सहल, केडीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आनंदावर पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 12:42 AM2020-01-22T00:42:09+5:302020-01-22T00:42:35+5:30
- जान्हवी मोर्ये डोंबिवली : केडीएमसी शाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल महापालिकेच्या लालफितीत अडकली आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी निविदा ...
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : केडीएमसी शाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल महापालिकेच्या लालफितीत अडकली आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी निविदा काढून ती मंजुरीसाठी प्रशासनाकडे पाठवली. मात्र, दोन महिने उलटूनही मंजुरी न मिळाल्याने यंदा विद्यार्थ्यांचे सहलीचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. याआधी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून निविदेला मंजुरी मिळताच जानेवारीत सहल काढण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. जानेवारीही संपत आल्याने आता उन्हाळी सुटीत सहल काढणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
केडीएमसी शाळेतील विद्यार्थी निम्न आर्थिक स्तरातील असतात. त्यामुळे त्यांना सहलीचा फारसा आनंद घेता येत नसल्याने केडीएमसीतर्फे सहलीचे आयोजन केले जाते. त्यासाठी प्रशासनाने अर्थसंकल्पात सहलीसाठी आर्थिक तरतूद केली आहे.
महापालिका शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना टप्प्या-टप्प्याने सहलीला नेले जाते. यंदा पहिली ते चौथीच्या साडेतीन हजार विद्यार्थ्यांची सहल किडझेनिया येथे नेली जाणार आहे, तर पाचवी ते आठवीच्या साधारण चार हजार विद्यार्थ्यांची सहल मुरबाडमधील वाळिंबे येथील मंदार कृषी तंत्रनिकेतन येथे नेण्यात येणार आहे.
यावर्षी सहलीची निविदा वेळेत मंजुरीसाठी गेलेली आहे. त्यासाठी एक कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही संबंधित अधिकारी सांगत होते. मात्र, आता प्रशासन फेबु्रवारीत सहल काढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. निविदाच मंजूर नसल्याने यंदा सहल जाईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. परिणामी ते सहलीच्या आनंदापासून मुकण्याची शक्यता आहे.
दहा वर्षांत आतापर्यंत दोनदाच सहल
फेबु्रवारीपासून शाळांमध्ये परीक्षांची तयारी सुरू होते. दहा वर्षांत आतापर्यंत दोनदाच या शाळेतील विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद घेता आला आहे.
मागच्या वर्षी तांत्रिक अडचणीमुळे सहल नेता आली नव्हती. या ना त्या कारणाने प्रशासन विद्यार्थ्यांच्या हौसेवर पाणी फेरत असल्याची टीका होत आहे.
सहलीसाठी दिलेली निविदा अजून मंजूर झाली नाही. पण लवकरच त्याला मंजूरी मिळेल. फेबु्रवारीपर्यंत सहल जाईल. यंदा विद्यार्थ्यांची सहल नक्की जाणार आहे.
- जे. जे. तडवी, शिक्षण विभाग अधिकारी, महापालिका