होळीनंतरच केडीएमसी शाळांची टूरटूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:32 AM2018-02-22T00:32:27+5:302018-02-22T00:32:37+5:30

मुंबई दर्शनाला निघणा-या केडीएमसीच्या शाळेच्या सहलीला आता होळीच्या सणानंतरचा मुहूर्त मिळणार आहे. सहलीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या नेहरू तारांगणाची दुरूस्ती लांबणीवर पडल्याने सहलीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

KDMC school tourism only after Holi | होळीनंतरच केडीएमसी शाळांची टूरटूर

होळीनंतरच केडीएमसी शाळांची टूरटूर

Next

कल्याण : मुंबई दर्शनाला निघणा-या केडीएमसीच्या शाळेच्या सहलीला आता होळीच्या सणानंतरचा मुहूर्त मिळणार आहे. सहलीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या नेहरू तारांगणाची दुरूस्ती लांबणीवर पडल्याने सहलीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. ही दुरूस्ती २ मार्चपर्यंत चालू राहणार असल्याने उन्हाचे चटके सहन करीत ऐन परीक्षेच्या तोंडावर सहलीचा आनंद लुटण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येणार आहे. याला शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार कारणीभूत ठरला असताना २७ फेब्रुवारीला सहल निघेल, हा सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी केलेला दावाही आता फोल ठरला.
गतवर्षी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता आणि केडीएमसी शिक्षण समितीची लांबणीवर पडलेली सभा यामुळे शालेय सहलीचा प्रस्ताव वेळेत मंजूर होऊ शकला नाही. परिणामी विद्यार्थी सहलीपासून वंचित राहिले. याआधी दोन वर्षे तांत्रिक कारणामुळे सहल काढण्यात आली नव्हती. यंदाही शिक्षण विभागाच्या भोंगळ आणि उदासीन कारभारामुळे सहल लांबणीवर पडली असून विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद आजवर लुटता आलेला नाही. यंदा ‘मुंबई दर्शन’ ठरवण्यात आले आहे. चौथी ते आठवी इयत्तेतील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना सहलीला नेण्यात येणार आहे. मुंबईच्या दर्शनात नेहरू तारांगण, तारापोरवाला मत्स्यालय, राणीची बाग येथे दिवसभरात मुलांना नेले जाणार आहे. परंतु सध्या नेहरू तारांगणाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने २६ फेब्रुवारीपर्यंत ते बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे २६ तारखेनंतरच सहल निघेल, असे शिक्षण विभागातर्फे सांगितले जात होते. २७ फेब्रुवारीला सहल निघेल, असा दावा शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी केला होता. परंतु नेहरू तारांगणाच्या दुरूस्तीचे काम २ मार्चपर्यंत चालणार असल्याने त्यानंतरच सहल निघेल, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त नितिन नार्वेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
१ मार्चला होळी, तर २ मार्चला धुलीवंदन आहे. सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांना सहलीला नेण्यात येणार असल्याने ही सहल टप्याटप्याने काढली जाईल. मार्चच्या पहिल्या अथवा दुसºया आठवड्यापर्यंत हा सहलीचा कार्यक्रम चालेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: KDMC school tourism only after Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.