केडीएमसी शाळा होणार डिजिटल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:17 AM2018-08-24T00:17:43+5:302018-08-24T00:18:15+5:30
केडीएमसीच्या शाळा खाजगी शाळांच्या तोडीसतोड व्हाव्यात, यासाठी सर्व शाळा डिजिटल करण्याचा प्रस्ताव गुरुवारी झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला.
कल्याण : केडीएमसीच्या शाळा खाजगी शाळांच्या तोडीसतोड व्हाव्यात, यासाठी सर्व शाळा डिजिटल करण्याचा प्रस्ताव गुरुवारी झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला.
शिक्षण समितीचे सभापती विश्वदीप पवार यांनी हा प्रस्ताव सभेत मांडला होता. महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू, गुजराथी, तामीळ माध्यमाच्या एकूण ६९ शाळा आहे. या शाळांच्या १९६ वर्गखोल्या असून त्या डिजिटल करण्यासाठी तीन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एक वर्ग डिजिटल करण्यासाठी दीड लाखाचा खर्च अपेक्षित आहे. शिक्षण समितीच्या लेखाशीर्षात असलेली ५० लाखांची तरतूद अपुरी आहे. त्यामुळे आणखी दोन कोटी ४० लाखांची गरज असून प्रशासनाने तशा प्रकारची तरतूद करावी, अशी सूचना पवार यांनी केली. खाजगी शाळा दर्जेदार शैक्षणिक सोयीसुविधा देतात. तशा सुविधा महापालिकेच्या शाळेत नसल्याने पालक व विद्यार्थी महापालिकेच्या शाळेकडे वळत नाही. त्यामुळे ते महापालिका शाळांकडे वळावेत, यासाठी शाळा डिजिटल करण्याचा प्रस्ताव मांडला गेला.
सदस्य वैजयंती घोलप यांनी त्या सभापती असताना ३० वर्ग डिजिटल करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यासाठी ३० लाख रुपयांची तरतूद ठेवली होती. त्याचे पुढे काय झाले, त्याचे उत्तर प्रशासनाकडे मागितले असता, वर्ग डिजिटल करण्यासाठी जीएम पोर्टलकडून साहित्यखरेदीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, आधीच्या प्रशासनास त्याची नीट माहिती नसल्याने त्या कामात विलंब झाला. त्यानंतर, आयुक्तांच्या आधार लिंकशी हे पोर्टल जोडले जाण्याची अट होती. युजर आयडी आयुक्तांच्या नावे तयार करायचा होता. आता सेकंड युजर आयडी शिक्षण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावे करण्याची अनुमती घेतली आहे. त्यानुसार, ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, असे सांगण्यात आले.
दरम्यान, १९६ वर्गखोल्यांमधून ३० वर्गखोल्यांचे डिजिटल करणे वगळावे, असे सूचित करण्यात आले. नवे निकष काय आहेत, याची शहानिशा करूनच प्रशासनाने ३० वर्गांचा निर्णय घ्यावा, असे पवार यांनी सूचित केले.
महापालिकेच्या शाळांमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग करता येत नाहीत. प्रयोगशाळा तयार करण्यासाठी साहित्यखरेदीस मंजुरी देण्यात आली.
बालवाडी शिक्षिकांच्या मानधनवाढीस मंजुरी
महापालिका हद्दीतील ५२ बालवाड्यांमध्ये एक हजार ८०० विद्यार्थी आहेत. या बालवाड्यांत ७३ शिक्षिका आहेत. महिन्याला त्यांना आठ हजार मानधन मिळत होते. त्यात २० टक्के यानुसार दोन हजार रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शिक्षिकांना दिलासा मिळाला आहे.
शैक्षणिक सहलीच्या ठिकाणांवर चर्चा
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची सहल कुठे न्यायची, याविषयी सूचना मागवल्या आहेत. त्यावर सगुणा बाग, कर्जत फिल्म स्टुडिओ, आरे दूध कॉलनी, चोंढे घाटघर येथील वीजप्रकल्प ही ठिकाणी सुचवली आहे. त्यावर, एकमत होणे अद्याप बाकी आहे. सहल वेळेत काढली जावी, अशी अपेक्षा आहे.