नागूबाईच्या ‘त्या’रहिवाश्यांना केडीएमसीचा झटका : तीन महिन्यांचे १८ टक्के जीएसटी आकारुन घरभाडे १९ हजार २९३ भरण्याच्या नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 06:39 PM2018-01-19T18:39:05+5:302018-01-19T19:01:54+5:30
बीएसयुपीच्या कचो-यातील घरांचे प्रतीमाह भाडे ५हजार ४५० रुपये, त्यातच १८ टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रती रहिवासी १९ हजार २९३ रुपये असे तीन महिन्यांचे भाडे तात्काळ भरावे अशा नोटीस नागूबाई निवासच्या रहिवाश्यांना बजावण्यात आल्या आहेत. त्यातच भर म्हणुन महावितरणने देखिल भरमसाठ वीजबील दिले. रहिवाश्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी दुपारी ठाण्यात भेट घेतली.
डोंबिवली: बीएसयुपीच्या कचो-यातील घरांचे प्रतीमाह भाडे ५हजार ४५० रुपये, त्यातच १८ टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रती रहिवासी १९ हजार २९३ रुपये असे तीन महिन्यांचे भाडे तात्काळ भरावे अशा नोटीस नागूबाई निवासच्या रहिवाश्यांना बजावण्यात आल्या आहेत. त्यातच भर म्हणुन महावितरणने देखिल भरमसाठ वीजबील दिले, त्यामुळे आम्ही त्रस्त आहोत. रात्रंदिवस आम्हाला चैन नाही, कुटुंबामध्ये त्यामुळे अस्वस्थता आहे, आम्ही काय करावे, भाड्यापोटी देण्यासाठी एवढे पैसे आमच्याकडे नाहीत, जे असतात ते दिले तर खायचे काय, जगायचे कसे? त्यापेक्षा रस्त्यावरच राहतो ना? इथेही आणि तिथेही त्रासच सहन करायचा आहे ना? असे सांगत नागूबाई निवासच्या रहिवाश्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी दुपारी ठाण्यात भेट घेतली. पालकमंत्री शिंदे यांनी तुम्हाला कचो-यातील बीएसयुपीची घरे कल्याण-डोंबिवली महापालिकेने दिलेली नसून राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहेत, तुम्ही निश्चिंत असावे असे सांगत रहिवाश्यांना दिलासा दिला.
आॅक्टोबर महिन्यात पश्चिमेकडील नागूबाई निवास एका रात्रीत खचली. त्यामुळे तेथे राहणारी ६०हून अधिक रहिवासी रातोरात रस्त्यावर आले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष मंजूरीमुळे पालकमंत्री शिंदेंनी त्या रहिवाश्यांना कचो-यात बीएसयुपीमध्ये घरे मिळवून दिली, पण सुरुवातीपासूनच तेथे पाणी नाही, वीज नव्हती, त्यानंतर महापौर राजेंद्र देवळेकर , सभागृह नेते राजेश मोरे, आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने कशाबशा सुविधा मिळाल्याचे प्रसाद भानुशाली, संजय पवार यांनी सांगितले. पण तरीही महापालिका प्रशासनाने मात्र प्रती माह ५ हजार ४५० रुपये भाड्याच्या नोटीसा दिल्या, त्यामुळे रहिवाश्यांच्या पायाखालची जमिनच सरकली, पण तरीही महापौर देवळेकर, मोरे यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे रहिवासी तेथे रहात आहेत. काहींनी घरांचा ताबा सोडला असून आता सुमारे २२ भाडेकरु तेथे राहतात. जानेवारीमध्येही नोटीस देण्यात आली असून त्यात गेल्या तीन महिन्यांचे भाडे तातडीने द्यावेत असे भानुशाली, पवार म्हणाले. त्यामुळे हैराण झालेल्या रहिवाश्यांनी पालकमंत्र्यांची ठाण्यात भेट घेतली. त्यावेळी भानुशाली, पवार यांच्यासह अनिल भडसावळे, तुकाराम पवार, संजय विराणी, राजानी अहुजा, शिवेंद्र वीश्वकर्मा, संतोष गट्टे, आकांक्षा भडसावळे, उषा गायकवाड, सविता कोंगे आदींनी पालकमंत्री शिंदेंना गा-हाणे मांडले, त्यांनी बिनधास्त रहा, शिवसेना तुमच्या सोबत असेल काळजी नसावी असे आश्वस्थ केल्याचे सांगण्यात आले.
* प्रतिमाह ५४५० रुपये असे ३ महिन्यांचे १६ हजार ३५० त्यावर जीएसटी १८ टक्के असे प्रतिमाह ९८१ रुपये असे आकारुन तीन महिन्यांचे २ हजार ९४३ रुपये असे एकूण प्रती भाडेकरु १९ हजार २९३ रुपये आकारण्यात येणार असल्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
-----------------