कचरा कंत्राटदाराला केडीएमसीचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:40 AM2021-03-16T04:40:57+5:302021-03-16T04:40:57+5:30
कल्याण : ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून देणे नागरिकांना बंधनकारक केले असताना, याच वर्गीकरण नियमाला धाब्यावर बसवणाऱ्या कंत्राटदाराला ...
कल्याण : ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून देणे नागरिकांना बंधनकारक केले असताना, याच वर्गीकरण नियमाला धाब्यावर बसवणाऱ्या कंत्राटदाराला केडीएमसीने दणका दिला आहे. चारपैकी एका प्रभागातील कचरा संकलनाचे त्याचे काम बंद केले आहे. यासंदर्भातील आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सोमवारी जारी केले आहेत. त्यानुसार संबंधित प्रभागात आता मनपाची यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
केडीएमसीने १० पैकी ब, क, ड आणि जे या चार प्रभागांतील कचरा संकलनाचे कंत्राट आर. ॲण्ड. बी इन्फ्रा या कंपनीला दिले होते. कचरा घंटागाडीत देताना त्याचे वर्गीकरण करणे नागरिकांना बंधनकारक आहे. परंतु, कंत्राटदार घराघरांतून कचरा गोळा करताना तो वर्गीकरण न करता एकत्रित करूनच डम्पिंगवर नेत होता. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.
कंत्राटदाराकडून कचरा संकलन करताना होणारी हलगर्जी पाहता ‘लोकमत’ने ‘कचरा वर्गीकरणाला कंत्राटदाराची तिलांजली’ या मथळ्याखाली सोमवारी वृत्त दिले होते. कंत्राटदाराला दिलेल्या प्रभागांतून कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबत त्याच्यावर दंडात्मक कारवाई करताना चारपैकी एक प्रभाग काढून घेऊन त्यात पालिकेची यंत्रणा काम करेल, असे कोकरे यांनी स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे त्यांनी सोमवारी आदेश जारी करीत ‘क’ प्रभागात कंत्राटदाराचे सुरू असलेले काम बंद करून तेथे मनपाचे कर्मचारी नियुक्त केले. आता त्यांच्याकडून कचरा संकलन करताना ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे कंत्राटदाराकडे चार प्रभाग दिल्यानंतर अन्य सहा प्रभागही टप्प्याटप्याने दिले जाणार होते. परंतु, कामातील हलगर्जी समोर आल्याने चारपैकी एक प्रभाग गमविण्याची वेळ त्याच्यावर आल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
--------------