मास्क न वापरणाऱ्यांना केडीएमसीचा दणका; आतापर्यंत पाच लाख १६ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:35 AM2020-09-10T00:35:59+5:302020-09-10T00:36:15+5:30
मोहीम अधिक तीव्र करणार
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. असे असतानाही अनलॉकमध्ये अनेक नागरिक घराबाहेर पडताना तोंडावर मास्क घालत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींविरोधात मनपाने कारवाई करून त्यांच्याकडून पाच लाख १६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे. मनपा हद्दीत मंगळवारपर्यंत कोरोनाचे ३२ हजार रुग्ण होते. दररोज ४०० ते ४५० च्या आसपास रुग्ण आढळत आहेत. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात नागरिक विविध कारणांनी घराबाहेर पडल्याने आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी केडीएमसीने कोविड केअर सेंटर, क्वारंटाइन सेंटर आणि कोविड रुग्णालये उभारली. त्यात अद्ययावत आरोग्य सोयीसुविधा पुरविल्या. सगळ्या बाजूने मनपाकडून कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मनपाच्या निरीक्षणानुसार इमारतीत कोरोना रुग्ण वाढत आहेत. तेथे सोशल डिस्टन्सिंग, होम आयसोलेशनचे पालन होत नाही.
अनलॉकमध्ये नागरिकांचा बाजार, बँका, कार्यालये आदी ठिकाणी वावर वाढला आहे. मात्र, ते सोशल डिस्टन्सिंगचे पालन व मास्कचा वापर करत नाहीत. मास्क न घातल्यास मनपाकडून ५०० रुपये दंड आकारला जात आहे. अनलॉकमध्ये मास्क न वापरणाऱ्यांचा शोध मनपाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने घेतला. मनपाने त्यांच्याकडून आतापर्यंत पाच लाख १६ हजार रुपये दंड वसूल केला आहे. यापुढेही मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे पवार म्हणाले.
...तर दुकानदारांवरही होणार कारवाई
अनलॉकमध्ये विविध दुकाने सुरू करण्याची परवानगी मनपा आयुक्तांनी दिली आहे. त्याचे आदेश १ सप्टेंबरला काढले आहे. या आदेशानुसार अनेक दुकानांनी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेतच दुकाने सुरू ठेवायची आहेत. मात्र, अनेक दुकानदार ७ वाजता दुकाने बंद करीत नाही. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. अशा दुकानदारांवर मनपाकडून देखरेख ठेवून त्यांच्या विरोधातही दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पवार यांनी सांगितले. यासंदर्भात सर्व प्रभाग अधिकाºयांना तशा सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक प्रभागातील दुकानदार अन्य नियमांचेही पालन करतात की नाही, यावर कडक नजर ठेवून नियमांचे उल्लंघन करणाºयांविरोधात कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.