केडीएमसीचे विद्यार्थी गणवेशविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:37 AM2019-02-01T00:37:55+5:302019-02-01T00:38:08+5:30
कार्यादेशाची प्रतीक्षा; शैक्षणिक वर्ष संपण्यास उरले अवघे दोन महिने
डोंबिवली : शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघे दोन महिने शिल्लक असले, तरी केडीएमसीच्या ६० शाळांमधील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. शिक्षण मंडळ समितीचे सभापती विश्वदीप पवार यांच्या म्हणण्यानुसार, गणवेशाची एक कोटी ९६ हजार रुपयांची कार्यादेशाची फाइल आयुक्तांच्या सहीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, आमच्याकडे कोणतीही फाइल रखडलेली नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे शिक्षण मंडळ समितीचा भोंगळ कारभार पुन्हा उघड झाला आहे.
एकीकडे महापालिका शाळांची पटसंख्या वाढीस लागावी, शाळांची इमारत, वर्गखोल्यांची दुरुस्ती व्हावी, मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आता शैक्षणिक वर्ष संपायला अवघे दोन महिने राहिले असूनही त्यांना गणवेश मिळालेला नाही. पवार हे गणवेशासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. परंतु, प्रशासन त्यांच्या सूचनांकडे कानाडोळा करत आहे.
याबाबत पवार म्हणाले, स्थायी समितीच्या बैठकीत गणवेशाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यानंतर, एक कोटी ९६ हजार रुपयांची कार्यादेशाची फाइल मंजुरीसाठी आयुक्तांच्या दरबारी प्रलंबित आहे. यासंदर्भात आयुक्त गोविंद बोडके म्हणाले की, माझ्याकडे एकही फाइल प्रलंबित नाही. जी कामे करायची ती तत्काळ केली जातात. जर अन्य कोणाकडे ती फाइल असेल, तर याबाबतची माहिती घ्यावी लागेल. पण, विद्यार्थ्यांची गैरसोय मात्र होऊ दिली जाणार नाही.
गणवेश व शालेय साहित्यखरेदीसाठी मे महिन्यातच नियोजन करायला हवे होते. अद्यापही काहीही हालचाल नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे या सर्वाला सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यातील भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचे दिसून येते.
- प्रकाश भोर्ईर, विरोधी पक्षनेते
मुलांना गणवेश आवश्यक असतात. तळागाळातील विद्यार्थी या शाळांमध्ये येत असतात. आयुक्त गोविंद बोडके हे सकारात्मक आणि संवेदनशील अधिकारी आहेत. ते नक्कीच यातून तोडगा काढतील. मुलांना लवकर गणवेश मिळावा, ही अपेक्षा.
- वैजयंती घोलप, माजी सभापती, शिक्षण समिती