२७ गावांतील मुलांचा ‘फुटबॉल’ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:27 AM2017-07-28T00:27:17+5:302017-07-28T00:27:21+5:30
केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील आठ शाळांच्या संघांना गुरुवारपासून सुरू झालेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला होता. ही बाब भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांना समजताच त्यांनी बिर्ला महाविद्यालय गाठून
डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील आठ शाळांच्या संघांना गुरुवारपासून सुरू झालेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला होता. ही बाब भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांना समजताच त्यांनी बिर्ला महाविद्यालय गाठून आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे प्रशासनाने नमते घेत या संघांना प्रवेश देणार असल्याचे स्पष्ट केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे व केडीएमसी यांनी बिर्ला कॉलेजच्या मैदानात जिल्हास्तरीय ५८ वी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा भरवली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी १७ व १४ वर्षे वयोगटांखालील ही स्पर्धा होत आहे. त्यात पालिका हद्दीतील २५ पेक्षा जास्त शाळांचे संघ सहभागी झाले आहेत. मात्र, २७ गावे ग्रामीण भागात येत असल्याचे कारण पुढे करत तेथील आठ शाळांच्या संघांना स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला. पाटील यांना ही बाब समजताच त्यांनी स्पर्धेचे ठिकाण गाठले. जोपर्यंत प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत मैदानातच आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे आयोजकांनी नमते घेतले. ग्रामीणमधील आठ शाळांचे सामने शुक्रवारी होणार आहेत.
पालिका विभागातील खेळाडूंना जिल्हापातळीवर खेळता यावे, यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सरकारदरबारी पाठपुरावा केला होता. २७ गावांमधील शाळा आजपर्यंत पालिकेकडे हस्तांतरित झालेल्या नाहीत. त्यामुळे तेथील खेळाडूंना स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला. या शाळा तातडीने जिल्हा परिषदेने पालिकेस हस्तांतरित कराव्यात, असे आदेश १५ जूनला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने त्याचा फटका जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाºया शाळांना बसला.
कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण इंगळे म्हणाले, केडीएमसीचे प्रभारी क्रीडा अधिकारी राजेंद्र मुकणे यांनी २७ गावांतील शाळा केडीएमसीकडे हस्तांतरित न केल्याने स्पर्धेत खेळाडू्ंना प्रवेश नाकारला होता. ग्रामीण भागातील शाळाही केडीएमसीकडे कर भरतात. मग, तेथील खेळाडूवर अन्याय का? तसेच ग्रामीण भागातून स्पर्धेत उतरल्यास विद्यार्थ्याला प्रथम तालुका, जिल्हा आणि विभाग या पातळीवरून जावे लागते. २७ गावांतील शाळा केडीएमसीत आल्याने विद्यार्थी आता जिल्हा पातळीवर खेळू शकतो. मग, तालुका पातळीवर खेळून खेळाडूंचे नुकसान का करायचे? डिसेंबरपर्यंत अशा ४० प्रकारच्या विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.