केडीएमसीच्या विद्यार्थ्यांना घडणार मुंबई दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 02:50 AM2018-02-09T02:50:50+5:302018-02-09T02:50:59+5:30
‘केडीएमसीच्या विद्यार्थ्यांची सहल कागदावरच’ या शीर्षकाखाली बुधवारी ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच शिक्षण विभागाने सहलीचा प्रस्ताव वित्तीय मान्यतेसाठी त्याच दिवशी स्थायी समितीच्या सभेत मांडला.
कल्याण : ‘केडीएमसीच्या विद्यार्थ्यांची सहल कागदावरच’ या शीर्षकाखाली बुधवारी ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच शिक्षण विभागाने सहलीचा प्रस्ताव वित्तीय मान्यतेसाठी त्याच दिवशी स्थायी समितीच्या सभेत मांडला. त्याला मान्यता मिळाल्याने अखेर चार वर्षांनंतर विद्यार्थ्यांना ‘मुंबई दर्शन’ या सहलीचा आनंद लुटता येणार आहे. दरम्यान, प्रस्तावाच्या दिरंगाईप्रकरणी सभापती राहुल दामले यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाºयांना खडेबोल सुनावले. त्यावर, दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होताच सहलीचा प्रस्ताव सादर केला जाईल, असे स्पष्टीकरण शिक्षण विभागाचे अधिकारी जे. जे. तडवी यांनी दिले.
मागील वर्षी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता आणि केडीएमसी शिक्षण समितीची लांबणीवर पडलेली सभा, यामुळे शालेय सहलीचा प्रस्ताव वेळेत मंजूर होऊ शकला नाही. परिणामी, विद्यार्थी सहलीपासून वंचित राहिले. याआधी दोन वर्षे तांत्रिक कारणामुळे सहल काढण्यात आली नव्हती. यंदाही सहल लांबणीवर पडली. वास्तविक नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये सहल निघणे अपेक्षित होते. परंतु, शिक्षण विभागाच्या भोंगळ आणि उदासीन कारभाराचा फटका यंदाही बसला.
शिक्षण समितीने सहलीच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. यात ‘मुंबई दर्शन’ हे ठिकाण निश्चित करण्यात आले. चौथी ते आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना सहलीला नेण्यात येणार आहे. परंतु, सहलीच्या प्रस्तावाला स्थायी समितीची वित्तीय मान्यता घेण्यात आली नव्हती. अखेर, बुधवारी झालेल्या स्थायीच्या सभेत हा आयत्या वेळचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी दाखल केला होता. प्रस्ताव चर्चेला येताच दामले यांनी दिरंगाई का झाली? याबाबत, प्रशासनाला जाब विचारला. या वेळी शिक्षण विभागाच्या तडवी यांनी नोव्हेंबरमध्ये हा प्रस्ताव दिल्याचे सांगत दिरंगाई झाल्याचे मान्य केले. त्यावर दामले यांनी प्रस्ताव उशिरा दाखल केल्याप्रकरणी तडवी यांना खडसावले. यापुढे प्रस्ताव कधी सादर केला जाईल, अशी विचारणाही दामले यांनी केली. यावर आॅगस्टपर्यंत दिला जाईल, असे तडवी म्हणाले. परंतु, प्रशासनाच्या कामाची धीमी गती पाहता हा प्रस्ताव शैक्षणिक वर्ष सुरू होताच सादर करावा, असे आदेश दामले यांनी या वेळी दिले.
>चांगले खाद्यपदार्थ द्या
सहलीच्या वेळी विद्यार्थ्यांना सकाळ-सायंकाळचा नाश्ता, दुपारचे भोजन देण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकारी तडवी यांनी दिली. खाद्यपदार्थ चांगल्या दर्जाचे द्यावेत, त्याचबरोबर सहलीसाठी नेल्या जाणाºया बसही चांगल्या असाव्यात, अशा सूचना सदस्यांनी केल्या. या बसची पाहणी स्थायीचे सदस्य करतील, असे दामले या वेळी म्हणाले.