केडीएमसी परिवहन निवडणूक : भाजपा बंडखोराचा अर्ज बाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 03:17 AM2019-02-09T03:17:50+5:302019-02-09T03:18:10+5:30

केडीएमसीच्या परिवहन समिती सदस्य निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात आली.

KDMC transport election: BJP rebel application after | केडीएमसी परिवहन निवडणूक : भाजपा बंडखोराचा अर्ज बाद

केडीएमसी परिवहन निवडणूक : भाजपा बंडखोराचा अर्ज बाद

Next

कल्याण : केडीएमसीच्या परिवहन समिती सदस्य निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात आली. एकूण १० अर्जांपैकी भाजपाचे बंडखोर उमेदवार प्रशांत माळी यांचा अर्ज बाद ठरला आहे. दरम्यान, अन्य उमेदवारांनी अर्जांसोबत जोडलेली प्रमाणपत्रे बोगस असून त्याची चौकशी करावी, असे पत्र माळी यांनी सचिव संजय जाधव यांना दिले आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही माळी यांनी यावेळी दिला.

परिवहनच्या रिक्त होणाऱ्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी १० जणांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये शिवसेनेचे सुनील खारूक, अनिल पिंगळे, बंडू पाटील यांच्यासह गणपत घुगे, भाजपाचे संजय मोरे, स्वप्नील काठे, दिनेश गोर, बंडखोर प्रशांत माळी आणि मनसेचे मिलिंद म्हात्रे आणि काँग्रेसचे गजानन व्यापारी यांचा समावेश आहे. भाजपाच्या माळी यांनी अर्ज भरताना सूचक आणि अनुमोदक म्हणून नगरसेवक न घेतल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला. त्यामुळे निवडणूक रिंगणात नऊ उमेदवारच आहेत. ११ फेब्रवारीला अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण माघार घेतो की, उमेदवारी अर्ज जैसे थे ठेवतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

परिवहनची निवडणूक १५ फेब्रुवारीला होत आहे. दरम्यान, गुरुवारी अर्ज दाखल करताना भाजपामधील बेबनाव, तर शिवसेनेमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहावयास मिळाले होते. यात शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे समर्थक गणपत घुगे यांचा अर्ज वैध ठरल्याने परिवहन सदस्य निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दरम्यान, छाननी प्रक्रियेत अर्ज बाद झालेल्या माळी यांनी उमेदवारांनी सोबत जोडलेली ट्रॅव्हल्स व ट्रान्सपोर्ट तसेच गॅरेज कामाचा अनुभव असल्याची प्रमाणपत्रे बोगस असल्याचा आरोप केला आहे. याबाबत, शहानिशा करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र सचिव जाधव यांना माळी यांनी दिले आहे. माळी यांच्या आरोपासंदर्भात जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माळी यांची तक्रार मिळाली असून त्यांना याबाबत योग्य ते उत्तर दिले जाईल, असे सांगितले.

आम्ही फक्त मेहनत करायची का?

भाजपामधील राकेश मुथा आणि विकी गणात्रा यांच्या नावांच्या चर्चेप्रमाणेच शिवसेनेत कृष्णा साळुंखे आणि दत्ता गिरी यांचे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात होते. गिरी यांना काँग्रेसमधून शिवसेनेत घेताना पदाचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे. पण, त्यांचा विचार करण्यात आला नाही.
तसेच ऐनवेळी नावे बदलून इतरांना संधी दिल्याने कल्याण पूर्वेतील काही प्रभागांमधील शिवसैनिक कमालीचे नाराज झाले आहेत. कल्याण पूर्व सहसंपर्कप्रमुख शरद पाटील यांनी आम्ही नाराज असल्याचे सांगितले. हेमंत चौधरी, कृष्णा साळुंखे आणि शांताराम दिघे हे इच्छुक होते, पण त्यांच्यापैकी कोणालाच संधी दिली नाही.
केवळ नगरसेवकाचा भाऊ, काका, पुतण्या यांनाच पदे मिळत असतील, तर आम्ही काय फक्त मेहनत करायची का? प्रामाणिक काम करणाºयांना डावलून बंडखोरांना मांडीवर बसवले जात आहे, असा आरोप पाटील यांनी केला.

सर्वांची इच्छा पूर्ण करू शकत नाही
जागा कमी आणि इच्छुकांची गर्दी जास्त, असे नेहमीच पाहायला मिळते. त्यामुळे सर्वच इच्छुकांना संधी देणे अशक्य असते. आता संधी मिळालेल्यांनीही वर्षानुवर्षे प्रतीक्षा केली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले.

Web Title: KDMC transport election: BJP rebel application after

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.