केडीएमसीत कामगारांनी केले घंटानाद आंदोलन; महापालिका प्रशासनाचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:32 AM2019-09-12T00:32:07+5:302019-09-12T00:32:17+5:30
सातवा वेतन आयोग देण्याची मागणी
कल्याण : सातव्या वेतन आयोगाची मागणी करूनही केडीएमसीच्या महासभेत हा विषय घेतला नसल्याच्या निषेधार्थ कामगारांनी बुधवारी महापालिका मुख्यालयात घंटानाद करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष रवी पाटील, प्रकाश पेणकर, अजय पवार, सुनील पवार यांच्या पुढाकाराने कामगारांनी घंटानाद आंदोलन केले.
महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. मात्र, महापालिका स्तरावर त्याचा ठराव करून तो सरकारदरबारी पाठवल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. यासंदर्भात कामगार संघटनेने यापूर्वी आयुक्तांसोबत बैठक घेतली. त्यावेळी कामगारांना सातवा वेतन आयोग देण्यास प्रशासनाची सकारात्मक भूमिका असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र, सातव्या वेतन आयोगाचा विषय १३ सप्टेंबरला होणाºया महासभेच्या पटलावर घेतलेला नाही. त्यामुळे त्याचा निर्णय कसा व कधी घेणार, असा संतप्त सवाल कामगारांनी केला आहे. येत्या आठवडाभरात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर, दोन महिने निवडणुकीची प्रक्रिया सुरू राहील. तसेच आचारसंहिता काळात महासभा होणार नाही. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाच्या विषयावर निर्णयच होणार नाही, याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. दरम्यान, १३ सप्टेंबरच्या महासभेत हा विषय आयत्या वेळचा विषय म्हणून घेता येऊ शकतो. मात्र, हा विषय न घेतल्यास कामगार सामूहिक रजा आंदोलन करतील, असा इशारा संघटनेने दिला आहे.