कल्याणमध्ये फेरीवाल्यांविरोधात केडीएमसीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:43 AM2019-11-22T00:43:43+5:302019-11-22T00:43:50+5:30
टेम्पो भरून माल जप्त; पोलीस बंदोबस्तात बडगा
कल्याण : पश्चिमेतील रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात गुरुवारी महापालिकेच्या फेरीवालाविरोधी पथकाने कारवाई केली. यावेळी फेरीवाल्यांची पळापळ झाली. कारवाई पथकाने एक मिनीटेम्पो भरून फेरीवाल्यांचा माल जप्त केला. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई झाल्याने तिला फेरीवाल्यांचा विरोध झाला नाही.
कल्याण-मुरबाड रोडवरील आंबेडकर उद्यानासमोर व रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यात रुग्णवाहिकेस अडथळा होईल, अशा प्रकारे फेरीवाले रस्त्याच्या दुतर्फा बसतात. त्यामुळे महापालिकेच्या फेरीवालाविरोधी कारवाई पथकाने पोलीस बंदोबस्तात तेथे कारवाई केली. यावेळी सरबताची गाडी तसेच फळविक्रेत्यांचा माल जप्त करण्यात आला. फेरीवालाविरोधी पथकाने स्कायवॉकवरील फेरीवाल्यांच्या विरोधातही कारवाई केली. पथकाने त्यानंतर साधना हॉटेल परिसरातील फेरीवाल्यांकडे मोर्चा वळविला.
महापालिकेकडून स्थानक परिसरात कारवाई झाल्यानंतरही फेरीवाले तेथे पुन्हा बसतात. एसटी डेपोसमोरील रेल्वेस्थानकातील सरकत्या जिन्यांच्या समोरच तसेच स्कायवॉकवर अत्तर, मोजे, बेल्ट आदी विक्रेत्यांची गर्दी असते. त्यामुळे स्कायवॉकवर पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा नसते. स्कायवॉक रेल्वेच्या पादचारी पुलाला लागून असल्याने तेथील फेरीवाल्यांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांच्याकडून कारवाई होताना दिसत नाही. रेल्वे परिसरात १५० मीटरच्या अंतरात फेरीवाले बसू न देणे ही रेल्वेची जबाबदारी आहे. मात्र, सगळी जबाबदारी महापालिकेच्या कारवाई पथकावर ढकलली जाते. कारवाईबाबत जबाबदारी कोणी घ्यायची, असाही मुद्दा असल्याने कारवाई होत नाही.
जागा देण्यापूर्वीच कारवाई का?
राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवण्यासाठी महापालिकेने सोडत पद्धतीने डोंबिवलीतील फेरीवाल्यांना जागांचे वाटप केले. मात्र, कल्याणमधील फेरीवाल्यांच्या जागांची सोडत अद्याप पार पडलेली नाही. त्यामुळे जागा देण्यापूर्वी कारवाई करून माल जप्त करणे योग्य आहे का, असा सवाल फेरीवाल्यांनी उपस्थित केला आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार आधी जागा दिली गेली पाहिजे. त्या जागेत फेरीवाला व्यवसाय करीत नसेल, तर त्याच्याविरोधात कारवाई केल्यास त्याला फेरीवाल्यांचा विरोध नसेल. मात्र, या मुद्याकडे कारवाई करणारी महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचे फेरीवाल्यांकडून सांगण्यात आले.