थकबाकीदारांना केडीएमसीचा चाप
By admin | Published: February 17, 2017 02:09 AM2017-02-17T02:09:24+5:302017-02-17T02:09:24+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेने पाणीपुरवठा थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पाणीपुरवठा विभागाने
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने पाणीपुरवठा थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पाणीपुरवठा विभागाने गुरुवारपर्यंत केलेल्या कारवाईत २२ लाख २६ हजारांच्या थकबाकीप्रकरणी १०९ जणांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. मालमत्ता थकबाकीदारांनीही तातडीने थकीत रकमा भराव्यात, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
करवसुली थंडावल्याप्रकरणी आयुक्तांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांचे मासिक वेतन रोखण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, सोमवारी आढावा बैठकीतही त्यांनी करवसुलीची माहिती घेतली. मालमत्तावसुलीचा आढावा घेताना आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना अधिक जोमाने मालमत्ताकराची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले होते. मोठ्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याबरोबरच नळजोडण्या खंडित करण्याच्या सूचना त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. दुसरीकडे बुधवारी झालेल्या करदरवाढीच्या विशेष स्थायी समितीच्या सभेत सभापती रमेश म्हात्रे यांनी पाणीचोरी, गळतीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन बेकायदा नळजोडण्या शोधून काढा, असे आदेश प्रशासनाला देत दरवाढ फेटाळून लावली होती. (प्रतिनिधी)