केडीएमसीच्या सेना नगरसेविका वैजयंती घोलप यांचे सदस्यत्व रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 00:53 IST2018-10-27T00:53:06+5:302018-10-27T00:53:14+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माजी महापौर व विद्यमान शिवसेना नगरसेविका वैजयंती घोलप यांचे सदस्यत्व अखेर रद्द करण्यात आले आहे.

केडीएमसीच्या सेना नगरसेविका वैजयंती घोलप यांचे सदस्यत्व रद्द
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माजी महापौर व विद्यमान शिवसेना नगरसेविका वैजयंती घोलप यांचे सदस्यत्व अखेर रद्द करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच जातवैधता प्रमाणपत्र समितीने घोलप यांनी सादर केलेले जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. समितीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी घोलप यांचे सदस्यत्व रद्द केले. महापालिकेचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
वैजयंती घोलप यांनी प्रभाग क्रमांक-२४ मधून पालिकेची निवडणूक लढवली होती. त्यांनी धनगर जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यांनी ज्या प्रभागातून निवडणूक लढवली, तो प्रभाग इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव होता. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे भाजपाचे प्रतिस्पर्धी व पराभूत उमेदवार गौरव गुजर यांनी घोलप यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्या धनगर जातीच्या नसून त्या इतर मागासवर्ग प्रवर्गात मोडत नाहीत. गौरव यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे चौकशी केल्यानंतर जातवैधता प्रमाणपत्रपडताळणी समितीने घोलप यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द केले.
>जातवैधता प्रमाणपत्र समितीने वैजयंती घोलप यांचे प्रमाणपत्र रद्द केल्यावर त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. घोलप यांनी त्यांच्या जातीसंदर्भात १९२५ सालापासूनचे पुरावे सादर केले होते.