केडीएमसीची भिवंडी-कल्याण बस पुन्हा सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:08 AM2019-05-08T01:08:34+5:302019-05-08T01:08:53+5:30
गेल्या काही वर्षापासून बंद असलेली केडीएमसीची भिवंडी-कल्याण सिटीबस शिवाजी चौकातून दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून सुरू झाली आहे.
भिवंडी - गेल्या काही वर्षापासून बंद असलेली केडीएमसीची भिवंडी-कल्याण सिटीबस शिवाजी चौकातून दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून सुरू झाली आहे. ही बस सुरू झाल्यामुळे विद्यार्थी व नोकरदारांची मोठी सोय झाली असून त्यांनी या सेवेचे स्वागत केले आहे.
भिवंडीतील नागरिकांच्या मागणीवरून कल्याण डोंबिवली महापालिकेने शिवाजी चौक ते कल्याण सिटीबस सुरू केली. या सिटीबसला रिक्षाचालकांनी विरोध केला. काही रिक्षाचालकांनी कल्याणरोड भागात बसच्या काचा फोडल्या.
केडीएमसी व्यवस्थापनाने अधिक नुकसान होऊ नये म्हणून शहरात येणाऱ्या सिटीबस बंद केल्या. मनपाचे नगरसेवक, पोलीस उपायुक्त व लोकप्रतिनिधी यांनी रिक्षा चालकांवर कोणतीही ठोस कारवाई न करता दररोज होणारी प्रवाश्यांची लूट उघड्या डोळ्यांनी पाहिली. भिवंडी महापालिकेने गेल्या पंचवीस वर्षापासून आश्वासन देऊनही सिटीबस सुरू केली नाही. त्यामुळे जवळ असलेले कल्याण अथवा ठाणे रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी एस.टी. बस शिवाय पर्याय नव्हता.
दरम्यान केडीएसीची बस गोपाळनगरपर्यंत येऊ लागली तर ठाणे मनपाची बससेवा नारपोली व शिवाजी चौकापर्यंत यापूर्वी सुरू झाली. १ मे २०१९ रोजी भिवंडी-कल्याण प्रवासी बससेवा दर पंधरा मिनिटांनी सुरू झाली आहे. या मार्गावर भिवंडीतील शिवाजी चौक येथून पहिली बस पहाटे ३.३५ ची असून त्यानंतर ६.५५ वाजता पहिली बस शिवाजी चौकातून कल्याण येथे जाणार आहे तर शेवटची बस रात्री १२.५५ वाजता सुटणार आहे. कल्याणहून येण्यासाठी पहिली बस सकाळी ६ वाजता असून शेवटची बस १२ वाजता आहे. त्यानंतर पहाटे ३ वाजता एक बस येणार आहे. रात्री उशीरा सुटणाºया बसमुळे उत्तर भारतातून येणाºया सर्व कामगार व प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. केडीएमसीच्या वतीने ही बससेवा सुरू करून भिवंडीतील प्रवाशांची चांगलीच सोय केली आहे.
बसच्या काचाही फोडल्या
भिवंडीतील नागरिकांच्या मागणीवरून कल्याण डोंबिवली महापालिकेने शिवाजी चौक ते कल्याण सिटीबस सुरू केली. त्याला रिक्षाचालकांनी विरोध केला. काही चालकांनी कल्याणरोड भागात बसच्या काचा फोडल्या. अधिक नुकसान होऊ नये म्हणून या बंद केल्या.