केडीएमसीचा विकास भाजपाचीच जबाबदारी

By admin | Published: November 11, 2015 12:01 AM2015-11-11T00:01:47+5:302015-11-11T00:01:47+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत यावेळेस नागरी समस्यांच्या चर्चेचा अभाव दिसून आला. सर्वपक्षीय नेते नागरी समस्यांऐवजी हेव्यादाव्याचे राजकारण करण्यात दंग होते

KDMC's development is the responsibility of the BJP | केडीएमसीचा विकास भाजपाचीच जबाबदारी

केडीएमसीचा विकास भाजपाचीच जबाबदारी

Next

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत यावेळेस नागरी समस्यांच्या चर्चेचा अभाव दिसून आला. सर्वपक्षीय नेते नागरी समस्यांऐवजी हेव्यादाव्याचे राजकारण करण्यात दंग होते. परिणामी नागरिक अधिक त्रस्त झाले. मतांची कमी टक्केवारी हे त्याचे निदर्शक आहे. आता नागरिकांना केवळ विकास हवा आहे. त्यामुळेच त्यांनी या निवडणुकीत शिवसेना किंवा भाजपाला संपूर्ण बहुमत दिलेले नाही.
शिवसेनेच्या तुलनेने भाजपने निदान स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांवरच भर देणार असल्याचे सांगून आतापर्यंत ते झाले नसल्याचे कबूल केले. त्या तुलनेने शिवसेनेने मात्र त्यांनी जे गेल्या १५ वर्षात केलेच नाही ते दाखवून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याची भावना नागरिकांमध्ये होती. शिवसेनेच्या होर्डीग्जमध्ये देखील एक मत बाळासाहेबांना ही कॅच लाईन टाकली होती. त्यामुळे अजूनही बाळासाहेबांच्या नावानेच मते का मागावी लागतात, भावनेशी खेळून काय मिळणार, असा सवाल डोंबिवलीकरांनी केला. परिणामी डोंबिवलीकरांनी त्यांच्या उमेदवारांना चांगलेच पाणी पाजले. कल्याणमध्येही शिवसेनेला म्हणावे तसे यश आलेले नाही. त्यांच्या विद्यमान महापौरांसह सभागृह नेते कैलास शिंदे यांनाही नागरिकांनी घरचा रस्ता दाखवला. निवडणुकीच्या गेल्या पंधरा-वीस दिवसात डोंबिवलीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये कल्याणमधील शिवसैनिकांमधील हेवेदावे ज्या पद्धतीने चव्हाट्यावर आले होते, त्याचा
समाचार शिवसैनिकांसह प्रसिद्धी माध्यमांनी घेतला होता. एकमेकांना शिवीगाळ करणे, खुर्च्या उचलून फेकण्यापर्यंत काहींची मजल गेली होती. तर काहींची हातापायी झाली होती. नागरिकांना अशा पद्धतीचे वातावरण नको आहे. सशक्त लोकशाहीसोबतच खेळीमेळीचे वातावरण अपेक्षित आहे. प्रचार काळात शिवीगाळ, दादागिरी, मारहाण याला ऊत आला. मनसेने नाशिकमध्ये त्यांनी जे दिवे लावले त्याचे गुणगान करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या येथील नगरसेवकांनी स्वत:च्या वॉर्डांसह परिसराची जी दैनावस्था केली होती, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. फेरीवाल्यापासून -(दाबेली वाल्या) व्यावसायिकांपर्यंत साऱ्यांना वेठीस धरण्याची किंमत काही लोकप्रतिनिधींना मोजावी लागली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना तर स्वत:ला निवडणुकीत सिद्धही करता आले नाही. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत सातत्याने त्यांची पिछेहाट झाली आहे. विरोधकांची भूमिका करण्याची संधी असतानाही त्यामध्ये दोन्ही काँग्रेसला यश आले नाही.
भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदीं बद्दलचा विश्वास, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मतदारांना आपल्या स्वच्छ चारित्र्याची घातलेली आर्त साद हे एकमेव कारण आहे. स्थानिक नेतृत्वामध्ये डोंबिवलीतील आमदार वगळता कल्याणमधील विशेषत: पश्चिमेतील आमदार आणि अन्य ठिकाणांहून आलेल्या नेत्यांना मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले.
त्या २७ गावांमध्येही डोंबिवलीचाच ट्रेंड असल्याने तेथेही संघर्ष समितीच्या माध्यमातून भाजपला यश मिळाले. तेथील बहुतांशी नागरिक - चाकरमानी हा जीवनावश्यक वस्तूंसह दळणवळणासाठी डोंबिवलीवरच अवलंबून आहे. त्यामुळे या शहरासह येथील रहिवाशांची त्यांचे जिव्हाळयाचे संबंध आहेत.

Web Title: KDMC's development is the responsibility of the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.