केडीएमसीचे ई प्रभाग कार्यालयच बेकायदा

By admin | Published: May 3, 2017 05:22 AM2017-05-03T05:22:01+5:302017-05-03T05:22:01+5:30

केडीएमसीच्या २७ गावांसाठी सुरू केलेल्या ई-प्रभाग क्षेत्राचे नवे कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या कार्यालयाची जागा

KDMC's e-division office is illegal | केडीएमसीचे ई प्रभाग कार्यालयच बेकायदा

केडीएमसीचे ई प्रभाग कार्यालयच बेकायदा

Next

डोंबिवली : केडीएमसीच्या २७ गावांसाठी सुरू केलेल्या ई-प्रभाग क्षेत्राचे नवे कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या कार्यालयाची जागा आरक्षित असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. त्यामुळे महापालिकेने त्या जागेवर बेकायदा बांधकाम केल्याचे स्पष्ट होत आहे. यावर महापालिकेकडून कोणतीच भूमिका घेतली जात नसल्याने ज्ञानेश्वर सोसायटीतर्फे लवकरच न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे.
दावडी परिसरातील ‘रिजन्सी गार्डन’मधील प्रशस्त जागेत ई प्रभाग क्षेत्राचे कार्यालय थाटण्यात आले. १२ फेब्रुवारीला या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. परंतु ही जागा येथील ज्ञानेश्वर सोसायटीच्या मालकीची आहे, असा दावा स्थानिक रहिवाशांनी केल्याने शुभारंभाचा कार्यक्रम वादग्रस्त ठरला होता. स्थानिक रहिवासी विश्वनाथ पटवर्धन यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सोसायटीतर्फे महापालिका आयुक्त ई रवींद्रन, महापौर राजेंद्र देवळेकर, प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार आणि मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनाही कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत.
महापालिकेच्या नगररचना विभागाने मंजुरी दिल्याप्रमाणे ही जागा दवाखाना व बालवाडी, यासाठी आरक्षित ठेवल्याकडे तक्रारदार विश्वनाथ पटवर्धन यांनी लक्ष वेधले आहे. या आरक्षित जागेवर ई प्रभाग कार्यालय थाटणे म्हणजे एकप्रकारे महापालिकेकडूनच अतिक्रमण झाल्याचा त्यांचा आरोप आहे. या अतिक्रमण प्रकरणी पटवर्धन यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात आयुक्तांसह अन्य एका खाजगी संस्थेविरोधात तक्रार दिली आहे. तसेच ज्ञानेश्वर सोसायटीने केडीएमसीचे आयुक्त, महापौर, प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार आणि मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनाही कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत.
दरम्यान, पटवर्धन यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीत जेथे हे कार्यालय उभारले आहे, ती जागा अ‍ॅमेनिटी स्पेस म्हणून दवाखाना आणि बालवाडी, यासाठी आरक्षित असल्याचे समोर आले आहे. या क्षेत्राचा वापर हा स्थानिक तसेच संकुलातील रहिवाशांनी करावयाचा आहे. या क्षेत्राची विक्री करता येणार नाही, असेही दिलेल्या माहितीत नमूद केले आहे. या माहितीच्या आधारे महापालिकेने या जागेवर बेकायदा बांधकाम केल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे पटवर्धन यांचे म्हणणे आहे.
पाण्यासाठी वणवण
पिण्याच्या पाण्यासाठी या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वणवण करावी लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना बाटलीबंद पाणी तसेच टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. विशेष म्हणजे, पाण्याची नवीन जोडणीही घेतलेली नाही. टाकीचा पंप बिघडल्याने टँकरचे पाणीही आता मिळेनासे झाले आहे. बांधकाम विभागाचे याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे खर्च लाखोंचा पण पाण्यासाठी वणवण, असे काहीसे चित्र चार दिवसांपासून या कार्यालयात पहावयास मिळत आहे. पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागाची यात टोलवाटोलवी सुरू असल्याने ही समस्या ‘जैसे थे’ आहे. (प्रतिनिधी)


महासंचालकांकडे दाद मागणार

ई-प्रभाग कार्यालयाच्या झालेल्या अतिक्रमणप्रकरणी महाराष्ट्र रिजनल अ‍ॅण्ड टाउन प्लानिंग अ‍ॅक्टनुसार कारवाई व्हावी, अशी तक्रार विश्वनाथ पटवर्धन यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.
महापालिका आणि अन्य एका संस्थेने बेकायदा बांधकाम केले असून सोसायटीचा विश्वासघात, फसवणूक केली आहे. हे कृत्य दखलपात्र गुन्हा असून संबंधितांवर एफआयआर दाखल करून गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी पटवर्धन यांनी केली आहे. परंतु, पोलीस गुन्हा दाखल करण्यास जाणुनबुजून टाळाटाळ करतात, असा आरोप त्यांचा आहे.
वारंवार निदर्शनास आणूनही दखल घेतली जात नसल्याने पोलीस महासंचालक तसेच ठाणे पोलीस आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले.

Web Title: KDMC's e-division office is illegal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.