केडीएमसीच्या पोटनिवडणुकीत युतीमुळे भाजपची झाली कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:44 PM2019-06-06T23:44:19+5:302019-06-06T23:44:31+5:30

रामबाग पोटनिवडणूक बिनविरोध? : दोन उमेदवारांचे अर्ज दाखल, एक माघार घेणार

The KDMC's by-election was due to the BJP's collapse | केडीएमसीच्या पोटनिवडणुकीत युतीमुळे भाजपची झाली कोंडी

केडीएमसीच्या पोटनिवडणुकीत युतीमुळे भाजपची झाली कोंडी

googlenewsNext

कल्याण : केडीएमसीच्या रामबाग खडक प्रभागातील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार म्हणून माजी नगरसेवक सचिन बासरे यांनी अर्ज दाखल केला. युवासेनेचे पदाधिकारी असलेले प्रशांत पाटील यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. परंतु, ते माघार घेतील, असे शिवसेनेने स्पष्ट केल्याने बासरे हे बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचे चित्र सोमवारी स्पष्ट होईल. दरम्यान, काँग्रेसने ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर, २०१५ मध्ये शिवसेनाविरोधात निवडणूक लढवणाऱ्या भाजपची युतीमुळे पोटनिवडणुकीत मात्र कोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले.

रामबाग खडक प्रभागाच्या शिवसेनेच्या नगरसेविका वैजयंती गुजर-घोलप यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द झाले. त्यामुळे या प्रभागात २३ जूनला पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी कोणकोण उमेदवारी अर्ज भरणार, याकडे लक्ष लागले होते. महापालिकेच्या २०१५ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकमेकांविरोधात लढले होते. त्यामुळे या पोटनिवडणुकीत युतीचा उमेदवार असेल की भाजप स्वतंत्र उमेदवार उभा करणार, याबाबतही उत्सुकता होती. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत युती होणार असल्याने पोटनिवडणूक भाजप लढवणार नाही, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली होती. त्याची प्रचीती गुरुवारी आली. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून सेनेच्या बासरे यांनी दोन अर्ज भरले. यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, महापौर विनीता राणे, भाजप नगरसेवक वरुण पाटील, अर्जुन भोईर, भाजप कोअर कमिटी सदस्य व पदाधिकारी शशिकांत कांबळे, युतीचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत नागरिकांचा मागासवर्ग म्हणून आरक्षित असलेल्या या प्रभागात भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात निवडणूक लढले होते. यात वैजयंती गुजर-घोलप यांनी भाजपच्या गौरव गुजर यांचा पराभव केला होता. गौरव गुजर यांनी पुढे घोलप यांच्या जातप्रमाणपत्राला घेतलेल्या हरकतीवर त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले. त्यामुळे यंदा गुजर पोटनिवडणूक लढवतील, अशी शक्यता होती. तसा कार्यकर्त्यांचाही आग्रह होता. परंतु, युतीमुळे गुजर यांना निवडणूक न लढवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे बोलले जाते.

सव्वा वर्षाचा मिळणार कालावधी
अभ्यासू नगरसेवक म्हणून बासरे यांची ओळख आहे. ते २००० ते २०१० या कालावधीत ते नगरसेवक होते. काळा तलाव प्रभागाचे नेतृत्व करणाºया बासरे यांनी सभागृह नेतेपद आणि स्थायी समिती सदस्य अशी पदेही भूषवली आहेत. त्यांची पत्नी समीधा बासरे या २०१० ते २०१५ या कालावधीत नगरसेविका होत्या. सध्या त्यांचे बंधू सुधीर बासरे हे नगरसेवक आहेत. बासरे हे बिनविरोध निवडून आल्यास सव्वा वर्षाचा कालावधी त्यांना मिळणार आहे.

मैत्रीपूर्ण संबंधांमुळे माघार?

  • काँग्रेसतर्फे ओबीसी सेलचे कल्याण शहर जिल्हाध्यक्ष रवींद्र परटोले हे उमेदवारी अर्ज भरतील, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी बुधवारी दिली होती. परंतु, गुरुवारी काँग्रेसतर्फे कोणीच अर्ज भरला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
  • पोटे यांचे शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानेच पोटनिवडणुकीत उमेदवार उभा न करता शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध निवडून यावा, यासाठी सहकार्य केल्याची चर्चा आहे.
  • विशेष म्हणजे पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्षा कांचन कुलकर्णी या निवडणूक कार्यालय असलेल्या केडीएमसीच्या ‘ब’ प्रभाग कार्यालयाच्या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या होत्या. परंतु, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ता तेथे नसल्याने त्यांच्याही चेहºयावर आश्चर्याचे भाव होते.

आमची तयारी झाली होती. परंतु, जातीच्या दाखल्याला मान्यता नव्हती, म्हणून आम्ही माघार घेतली. मैत्रीपूर्ण संबंधांमुळे माघारीची चर्चा चुकीची आहे. - सचिन पोटे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष, कल्याण

Web Title: The KDMC's by-election was due to the BJP's collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.