केडीएमसीचे ‘अदलाबदली’चे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:48 AM2021-09-10T04:48:50+5:302021-09-10T04:48:50+5:30
कल्याण : केडीएमसीतील दोन अधिकाऱ्यांवर बेकायदा बांधकामात लाखो रुपयांच्या लाचेचा झालेला आरोप पाहता मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ...
कल्याण : केडीएमसीतील दोन अधिकाऱ्यांवर बेकायदा बांधकामात लाखो रुपयांच्या लाचेचा झालेला आरोप पाहता मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्या अधिकाऱ्यांकडील पदभार काढून घेतले आहेत. त्यांच्या जागी अन्य अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. ऑगस्टमध्ये आयुक्तांनी काही प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. परंतु, घडणारी लाचखोरीची प्रकरणे पाहता ठोस कारवाई अपेक्षित असताना नुसत्या अदल्याबदल्या करून अधिकाऱ्यांच्या कारभारात सुधारणा होईल का? अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
बेकायदा बांधकामावरील कारवाई टाळण्यासाठी लाखो रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली उपायुक्त अनंत कदम आणि ‘आय’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर गुरुवारी त्यांच्याकडील पदभारदेखील काढून घेण्यात आले आहेत. उपायुक्त कदम यांच्याकडे ‘ड’ आणि ‘आय’ प्रभागाची ‘विभागीय उपायुक्त’ म्हणून जबाबदारी दिली होती. परंतु, त्यांच्यावर झालेला लाचेचा आरोप पाहता त्यांच्याकडील संबंधित जबाबदारी काढून घेतली आहे. ते शिक्षण विभागाचे उपायुक्त म्हणूनच काम पाहतील. तर, प्रभाग अधिकारी शिंदे यांची लाचखोरीच्या आरोपामुळे ‘आय’ प्रभागातून उचलबांगडी करण्यात आली आहे. मूळचे कनिष्ठ लेखापरीक्षक असलेल्या शिंदे यांची बदली मनपा मुख्यालयातील लेखापरीक्षण विभागात केली आहे.
चव्हाण, सावंत यांच्याकडे पदभार
- कदम यांच्याकडे असलेली ‘ड’ आणि ‘आय’ प्रभागाची विभागीय उपायुक्त ही जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्यावर अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपविली आहे. तर, शिंदे यांच्या रिक्त झालेल्या प्रभाग अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार ‘अ’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्याकडे दिला आहे.
- ‘क’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी अक्षय गुडधे हे सध्या रजेवर आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रभागाचा अतिरिक्त कार्यभार सावंत यांच्याकडे दिला गेला होता. परंतु, सावंत यांना ‘अ’ प्रमाणेच आता ‘आय’ प्रभागाची धुरा सांभाळायची असल्याने त्यांच्याकडे ‘क’ प्रभागाचा दिलेला अतिरिक्त कार्यभार काढून घेत तो पदभार ‘फ’ प्रभागातील वरिष्ठ लिपिक संजय साबळे यांच्याकडे अतिरिक्त म्हणून देण्यात आला आहे.
-------------