‘धोकादायक’ सभागृहातच होणार केडीएमसीची महासभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 06:22 AM2017-08-08T06:22:36+5:302017-08-08T06:22:36+5:30
केडीएमसीच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहाचे पीओपी अलीकडेच कोसळल्याने धोकादायक बनलेल्या या सभागृहात महासभेची बैठक घेण्यास सदस्यांकडून विरोध होत असतानाच येत्या १६ आॅगस्ट रोजी त्याच सभागृहात बैठक बोलावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसीच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहाचे पीओपी अलीकडेच कोसळल्याने धोकादायक बनलेल्या या सभागृहात महासभेची बैठक घेण्यास सदस्यांकडून विरोध होत असतानाच येत्या १६ आॅगस्ट रोजी त्याच सभागृहात बैठक बोलावली आहे.
महापालिका भवन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहाचे पीओपी कोसळल्याची घटना १२ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. या सभागृहात मासिक महासभेसह मोठ्या बैठका पार पाडतात. ७ जुलैला तहकूब महासभा पार पडली होती. १२ जुलैला विधिमंडळ सदस्यांची या सभागृहात बैठक होणार होती. त्या पार्श्वभूमीवर ११ जुलैच्या सायंकाळी सभागृहाची पाहणी करून ते जय्यत तयार केले होते. परंतु, दुसºया दिवशी सकाळी ९ वाजता सभागृहाच्या छताला असलेले पीओपी सांगाड्यासह खालील आसनांवर कोसळल्याचे निदर्शनास आले.
या घटनेमुळे बांधकाम विभाग आणि देखभाल दुरूस्ती करणारा कंत्राटदार वादाच्या भोवºयात सापडले आहेत. छत कोसळण्याच्या घटनेची चौकशी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या घटनेला महिना होत आला तरी त्यांनी या संदर्भातील अहवाल अद्यापही आयुक्त पी. वेलरासू यांना सादर केलेला नाही.
दर महिन्याच्या २० तारखेला महासभा होते. महिनाभरात एक महासभा घ्यावी असा नियम आहे. आॅगस्ट महिन्यात सभागृहाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यात जागेअभावी महासभा घ्यायची कुठे? या विवंचनेत महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी पडले होते. महासभेचे आयोजन स्थायी समिती सभागृहात आसन व्यवस्था लावून करण्याबाबत चाचपणी करण्यात आली. हा प्रस्ताव महापौरांसह अन्य पदाधिकाºयांच्या पसंतीस पडला होती. मात्र आता ज्या सभागृहाचे छत कोसळले त्याच सभागृहात महासभा घेण्याचा निर्णय झाला आहे. पीओपीचा कोसळलेला सांगाडा काढण्यात आला असून अन्य कोणत्याही यंत्रणेचे नुकसान झालेले नाही. त्यामुळे तेथेच महासभा घेण्यावर प्रशासन आणि पदाधिका-यांचे एकमत झाल्याचे बोलले जात आहे.
वेळप्रसंगी हेल्मेट घालून हजर राहू : पीओपी कोसळल्याच्या घटनेनंतर तत्काळ दुरूस्तीच्या कामाला सुरूवात व्हायला हवी होती. तोपर्यंत महासभा दुसरीकडे घ्यायला हवी होती. त्यासाठी स्थायी समितीच्या सभागृहातही आसनव्यवस्था लावून पाहण्यात आली होती. तथापि ‘त्या’ सभागृहातच सभा होणार असेल तर हेल्मेट घालून तेथे जाऊ आणि आम्ही जनतेचे प्रश्न मांडू.
-मंदार हळबे, विरोधी पक्षनेते, कल्याण-डोंबिवली महापालिका
सभागृह धोकादायक नाही
सभागृह धोकादायक नाही, केवळ छताला असलेले पीओपी कोसळले होते. ते बाजूला काढण्यात आले आहे तसेच सभागृहाला गळती नाही त्यामुळे त्याठिकाणी महासभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- राजेंद्र देवळेकर, महापौर, कल्याण-डोंबिवली