केडीएमसीची करवाढ टळली

By admin | Published: February 15, 2017 04:33 AM2017-02-15T04:33:58+5:302017-02-15T04:33:58+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत अग्निशमन करात दीड टक्का आणि पाणीपुरवठा

KDMC's hike was escalated | केडीएमसीची करवाढ टळली

केडीएमसीची करवाढ टळली

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत अग्निशमन करात दीड टक्का आणि पाणीपुरवठा दरात वाढ करण्याचे प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. मात्र, कोणतीही कर वाढ करणार नाही, असे स्पष्टीकरण स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी मंगळवारी दिले. केडीएमसीमध्ये मालमत्ता कर सर्वाधिक असताना पुन्हा नव्याने करवाढ करून करदात्यांच्या माथी भुर्दंड मारणार नाही, अशी भूमिका म्हात्रे यांनी घेतली आहे. असे असले तरी या मागे ठाणे, उल्हासनगर व मुंबई महापालिका निवडणुकांचे सावट असल्याची चर्चा आहे.
सध्या केडीएमसीच्या योजनेमार्फत सरासरी ३१० दशलक्ष लीटर तर २७ गावांसाठी एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा प्रतिदिन केला जातो. केडीएमसीला प्रतिदिन उल्हास नदीतून २३४ दशलक्ष लीटर पाणी कोटा मंजूर आहे. बारावे आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्राव्यतिरिक्त जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत मोहिली येथे १०० दशलक्ष लीटर व नेतिवली येथे १५० दशलक्ष लीटर जलशुद्धीकरण केंद्र बांधून कार्यान्वित करण्यात आली आहेत. सध्या ४०० दशलक्ष लीटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता महापालिकेकडे आहे. परंतु, आस्थापना खर्च, विद्युत देयके, देखभाल-दुरुस्तीचा खर्च, रसायनांचा खर्च, पाण्याची रॉयल्टी आदी खर्चात दरवर्षी होणारी वाढ, त्यात महापालिकेने जेएनएनयुआरएम योजनेसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणे आवश्यक असल्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे.
महापालिकेने यापूर्वी एप्रिल २०१६ मध्ये दरवाढ केली होती. ही वाढ फक्त वाणिज्य वापरासाठीच केली होती. मात्र, पाण्याची नागरिकांची वाढती गरज व यासाठी होणाऱ्या खर्चाचा विचार करता पाणीपुरवठा तोट्यात चालवणे आर्थिकदृष्ट्या धोक्याचे आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या दरात वाढ करणे आवश्यक आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. २७ गावांचा विस्तार लक्षात घेता तेथे मुख्य जलवाहिन्या टाकणे, वितरण वाहिन्या टाकणे, यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांसाठी ३३ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे, असेही प्रस्तावात म्हटले आहे.
मालमत्ता करात कोणतीही वाढ नसल्याचे सांगितले जात असताना अग्निशमन दल सक्षमीकरणाचे कारण पुढे करीत दीड टक्क्यांनी करात वाढ करण्याचा प्रस्ताव बुधवारच्या सभेत मंजुरीसाठी ठेवला आहे. मात्र, ही करवाढ न करण्याचा निर्णय स्थायी समिती घेणार आहे.
पाणी गळती, पाणी चोरी रोखण्यास प्रशासन अपयशी ठरले असताना करदरवाढ नागरिकांच्या माथी कशाला मारता? असा सूरही स्थायी समितीचा आहे. नवनिर्वाचित सभापती रमेश म्हात्रे यांची बुधवारची पहिलीच सभा आहे. त्यामुळे ते यासंदर्भात काय निर्णय घेतात? याकडे कल्याण-डोंबिवलीचे लक्ष लागले होते. मात्र, मंगळवारी सायंकाळी त्यांनी कोणतीही कर दरवाढ करणार नाही, असे सांगून तूर्तास करदात्यांना दिलासा दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: KDMC's hike was escalated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.