वाणिज्य मालमत्ताधारकांना केडीएमसीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:31 AM2019-09-07T00:31:02+5:302019-09-07T00:31:08+5:30

कर भरण्यासाठी ७२ तासांची मुदत : अन्यथा मालमत्ता होणार जप्त

KDMC's Notice to Commercial Property Holders | वाणिज्य मालमत्ताधारकांना केडीएमसीच्या नोटिसा

वाणिज्य मालमत्ताधारकांना केडीएमसीच्या नोटिसा

googlenewsNext

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची आर्थिक उत्पन्नाची सगळी मदार मालमत्ता कराच्या वसुलीवर आहे. त्यामुळे महापालिकेने जानेवारीची वाट न पाहता आतापासून वसुलीची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाणिज्य वापर करणाऱ्या सहा हजार ६०५ मालमत्ताधारकांना नोटिसा पाठविल्या आहेत. मालमत्ता कराची चालू व थकबाकीची रक्कम ७२ तासांत न भरल्यास मालमत्ता जप्त केली जाईल, असा इशारा या नोटिशीत दिला आहे.

महापालिकेने यंदाच्या वर्षी ४८५ कोटींचे मालमत्ता कराच्या वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका डिसेंबरनंतर नोटिसा पाठवून कारवाई सुरू करते. परंतु, यंदाच्या वर्षी वसुलीचे लक्ष्य जास्तीचे असल्याने आतापासूनच नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेने त्यासाठी आधी वाणिज्य वापर करणाºया मालमत्ताधारकांना लक्ष्य केले आहे.
मालमत्तांचा वाणिज्य वापर करूनही महापालिकेकडे चालू कर व थकबाकी न भरण्याकडे मालमत्ताधारकांचा कल असतो. सामान्य नागरिकांना वसुलीसाठी लक्ष्य करू नये, अशी मागणी नगरसेवकांकडून वारंवार केली जाते. त्याचबरोबर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता सामान्यांना मालमत्ता कर भरण्यासाठी सक्ती करू नये, असे राजकीय मंडळींकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मालमत्ता कराच्या कर दरात वाढ करण्याचे प्रस्ताव प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर आणले जातात. परंतु, अशा प्रस्तावांमुळे नागरिकांवर आर्थिक भार पडणार असल्याने लोकप्रतिनिधी त्यांना विरोध करतात.
दरम्यान, वाणिज्य वापर करणाऱ्यांना महापालिकेने पाठविलेल्या नोटिशांनुसार त्यांनी कराचा भरणा केल्यास महापालिकेच्या तिजोरीत ६० ते ७० कोटी जमा होऊ शकतात, असा दावा मालमत्ता करवसुली विभागाने केला आहे.

७१ टक्के कर
केडीएमसी हद्दीतील सामान्य नागरिकांना विविध स्वरूपात ७१ टक्के कर भरावा लागतो. अन्य महापालिकांच्या तुलनेत करआकारणी अधिक होत आहे. त्यामुळे कर कमी करण्याचा प्रस्ताव व मागणी लोकप्रतिनिधींनी करूनही तो कमी केलेला नाही. दुसरीकडे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी वाणिज्य वापर करणाºयांच्या करात वाढ केली जाते.

Web Title: KDMC's Notice to Commercial Property Holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.