केडीएमसीचा कारभार आयुक्तांविना ठप्प?
By admin | Published: April 20, 2017 03:58 AM2017-04-20T03:58:48+5:302017-04-20T03:58:48+5:30
केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन हे सध्या प्रशिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. परंतु, त्यांचा प्रभारी कार्यभार सांभाळणारे भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ.
कल्याण : केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन हे सध्या प्रशिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. परंतु, त्यांचा प्रभारी कार्यभार सांभाळणारे भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे हे केडीएमसीत फिरकत नसल्याने महापालिकेचा कारभार ठप्प झाल्याचे चित्र आहे. गुरुवारच्या महासभेला तरी म्हसे उपस्थित राहतील का, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यात आता भिवंडी महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने ते आता केडीएमसीसाठी किती वेळ देतील, अशी चर्चाही पालिका वर्तुळात आहे.
रवींद्रन हे ९ एप्रिलला प्रशिक्षणासाठी मसुरी येथे गेले आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यभार भिवंडीचे आयुक्त म्हसे यांच्याकडे प्रभारी म्हणून सोपवण्यात आला आहे. रवींद्रन प्रशिक्षणाला गेल्यापासून शनिवारचे मलंग रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन वगळता अन्य कु ठल्याही दिवशी म्हसे हे केडीएमसीत फिरकलेले नाहीत. परिणामी, येथील कारभार एक प्रकारे ठप्प झाल्याचे चित्र आहे. आयुक्त नसल्याने अधिकाऱ्यांचे मात्र चांगलेच फावले आहे. आयुक्तांविना दैनंदिन कारभारावरही परिणाम झाला आहे. केवळ अतिक्रमण पाडण्याची मोहीम काही ठिकाणी प्रभाग अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त दीपक पाटील व कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांच्यात खडाजंगी झाली होती. म्हसे महापालिकेत येत नसल्याने अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनीच पाटील यांना समज दिली होती.
दरम्यान, आता भिवंडीच्या निवडणुकांमुळे म्हसे त्यात व्यस्त झाले आहेत. परिणामी, त्यांचा अधिक वेळ तेथे खर्च होणार आहे. रवींद्रन हे ५ मे रोजी प्रशिक्षणावरून परतणार आहेत. तोपर्यंत महापालिकेची धुरा कोणाच्या खांद्याावर, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)