पोहोच रस्त्यासाठी केडीएमसीचे श्राद्ध, चार जणांचे मुंडण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:52 AM2019-05-29T00:52:29+5:302019-05-29T00:52:37+5:30
शहराच्या पूर्व भागातील मातृछाया सोसायटीला पोहोच रस्ता नसल्याने रहिवाशांचे हाल होत आहे.
कल्याण : शहराच्या पूर्व भागातील मातृछाया सोसायटीला पोहोच रस्ता नसल्याने रहिवाशांचे हाल होत आहे. या रस्त्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या (आप) नेतृत्वाखाली सोसायटीतील रहिवाशांनी २१ मे पासून साखळी उपोषण सुरू केले आहे. केडीएमसी प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या चार जणांनी मुंडण करून महापालिकेच्या नाकर्तेपणाचे श्राद्ध घालून निषेध व्यक्त केला.
गौतम कांबळे, अजित कर्पे, मुकुंद कांबळे आणि गणेश खाकम यांनी मुंडण केले. तसेच त्यांच्या हस्ते महापालिकेचे श्राद्ध घालण्यात आले. याप्रसंगी आपचे पदाधिकारी धनंजय जोगदंड उपस्थित होते. २१ मे पासून ‘ड’ प्रभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. मात्र, या आंदोलनाची प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त रहिवाशांनी केडीएमसी ‘अमर रहे’च्या घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला. मातृछाया सोसायटीकडे जाणारा पोहोच रस्ता अर्धवट तयार केला आहे. हे काम पुन्हा सुरू करण्यात यावे, असे आदेश आयुक्तांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.
यासंदर्भात विविध पक्षाचे राजकीय लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केलेला आहे. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे साखळी उपोषण सुरू केले आहे. मुंडण व श्राद्ध आंदोलनानंतरही जाग आली नाही तर राज्यपालांकडे दाद मागून बेमुदत उपोषण केले जाणार असून आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
>नगरसेवक, आमदारांची भेट
दरम्यान, उपोषणकर्त्यांची मंगळवारी शिवसेनेचे नगरसेवक निलेश शिंदे यांच्यासह प्रशांत काळे यांनी भेट घेतली. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी भेट घेऊन उपोषणकर्त्यांची बाजू ऐकून घेतली.