रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ, केडीएमटी चालकाच्या पायाला दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 02:18 PM2020-10-02T14:18:13+5:302020-10-02T14:21:38+5:30
Potholes in Kalyan : रस्त्यावरील खड्डय़ामुळे आतापर्यंत तीन जणांना गंभीर दुखापत झाल्याची घटना महापालिका हद्दीत घडली आहे.
कल्याण - रस्त्यावरील खड्ड्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेतील चालक अवतार सिंग यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. रस्त्यावरील खड्डय़ामुळे आतापर्यंत तीन जणांना गंभीर दुखापत झाल्याची घटना महापालिका हद्दीत घडली आहे.
अवतार सिंग हे लालचौकी परिसरातील गणोश मंदिराजवळ राहतात. ते परिवहन सेवेत चालक आहे. काल दुपारी २.३० वाजता त्यांच्याजवळ असलेल्या दुचाकीने कामावर जाण्यासाठी निघाले होते. त्यांची दुचाकी सहजानंद चौकातील एका खड्डय़ात आदळली. त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले.
डाव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना नीट चालता येत नाही. त्यांनी उपचारासाठी महापालिकेच्या रुक्मीमीबाई रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या पायाचा एक्सरे काढण्यात आला आहे. त्याठिकाणी अस्थीव्यंग तज्ज्ञ आज उपलब्ध नसल्याने त्यांना घरी जावे लागले. उद्या ते पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात जाणार आहेत. दरम्यान काल सायंकाळी डोंबिवली औद्योगिक परिसरातील उस्मा पेट्रोल पंपानजीक आजदे गावात राहणारी एक महिला दुचाकीवरुन चालली होती. रस्त्यावरील खड्डय़ात तिची गाडी आदळून तिच्या गाडीला अपघात झाला. ती गाडीवरु खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याच वेळी त्याठिकाणाहून जाणारे मनसेचे कार्यकर्ते प्रितेश म्हामूणकर जात होते. त्यांनी हा प्रकार पाहिला.
खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ
महिलेचा मदतीला ते धावले. त्याचबरोबर सोलार टेम्पो चालविणारे राजन मुकादम यांनी त्यांच्या टेम्पोत बसवून महिलेस उपचाराकरीता खाजगी रुग्णालयात नेले. काल मनसेने खड्ड्यांच्या निषेधार्थ खड्डय़ात केप कापून महापालिकेच्या नाकर्तेपणाचा निषेध केला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी येत असलेले मनसेचे कार्यकर्ते प्रशांत पोमेणकर यांच्या दुचाकीला खड्डय़ामुळे अपघात होऊन त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली. सात टाके पडले. त्याचबरोबर एका वृत्तवाहिनाचा कॅमेरामॅन प्रथमेश वाघमारे याच्या दुचाकीला ९० फूटी रस्त्यावरील खड्डय़ामुळे अपघात झाला. तो बचावला असला तरी त्याच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. या घटना पाहता रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली जात आहे.