केडीएमसीत ‘कामबंद’
By admin | Published: March 17, 2017 06:03 AM2017-03-17T06:03:50+5:302017-03-17T06:03:50+5:30
भाजपा नगरसेवक शैलेश धात्रक यांनी आपल्याला बुधवारी शहर अभियंत्याच्या दालनात मारहाण केल्याचा आरोप केडीएमसीचे कनिष्ठ अभियंता महेश गुप्ते यांनी केला आहे.
कल्याण : भाजपा नगरसेवक शैलेश धात्रक यांनी आपल्याला बुधवारी शहर अभियंत्याच्या दालनात मारहाण केल्याचा आरोप केडीएमसीचे कनिष्ठ अभियंता महेश गुप्ते यांनी केला आहे. याप्रकरणी गुप्ते यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे बाजारपेठ पोलिसांनी धात्रक यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी महापालिका कामगारांनी दोन तास कामबंद आंदोलन केले.
शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्या दालनात बुधवारी गुप्ते चर्चा करत असताना तेथे धात्रक आले. धात्रक यांनी गुप्ते यांना त्यांच्या प्रभागातील उद्यानाच्या कामाची फाइल का मंजूर करत नाही, ती कधी मंजूर करणार, अशी विचारणा करत धक्काबुक्की व शिवीगाळ केली. तसेच बघून घेण्याची धमकी दिली.
यासंदर्भात धात्रक यांनी सांगितले की, न झालेल्या कामाचा जाब मी गुप्ते यांना विचारला. तेथे आमची बाचाबाची झाली. त्यात कुलकर्णी यांनी मध्यस्थी केल्यावर आम्ही दालनाबाहेर पडलो. मात्र, दालनाबाहेर मी मारहाण केली, असा आरोप गुप्ते यांनी केला. तसेच माझ्याविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. हा प्रकार एखाद्या दबंग नगरसेवकांकडून झाला असता, तर गुप्ते तक्रार देण्यासाठी गेले असते का? मी मारहाण केल्याचा गुप्ते यांचा आरोप आहे. महापालिकेचे सीसीटीव्ही फुटेज पाहावे. त्यात मी दोषी आढळल्यास माझ्यावर पोलिसांनी कारवाई करावी, असे ते म्हणाले. भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून गुप्ते यांनी माझ्याविरोधात तक्रार दिली आहे, असा आरोपही धात्रक यांनी केला आहे.
कुलकर्णी यांनी सांगितले की, माझ्या दालनात धात्रक व गुप्ते यांच्यात शाब्दिक चकमक झाली, ही वस्तुस्थिती आहे. त्यात, मी मध्यस्थी करत त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, धात्रक यांचा समर्थक गुप्ते यांच्या अंगावर धावून आला. पण, त्याने मारहाण केली नाही.
गुप्ते यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत धात्रक यांचा व्यवसाय काय, हे माहीत नसल्याचे नमूद केले आहे. धात्रक हे नगरसेवक आहेत. हे गुप्ते यांना माहीत नाही का, याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. तर, धात्रक यांनी सीसीटीव्ही पाहून काय ते तपासावे, असे आव्हान दिले असले, तरी कुलकर्णी यांच्या दालनात सीसीटीव्ही नाही. (प्रतिनिधी)