केडीएमटी व्यवस्थापक आता महासभेच्या रडारवर, सोमवारच्या सभेकडे लक्ष : अशासकीय प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:41 AM2017-11-15T01:41:34+5:302017-11-15T01:41:43+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवक आणि पदाधिका-यांना नेहमीच सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिका-यांचे वावडे राहिले आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवक आणि पदाधिका-यांना नेहमीच सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिका-यांचे वावडे राहिले आहे. केडीएमटी सदस्यांनी अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव नुकताच मंजूर केला असून हा ठराव अंतिम मंजुरीसाठी २० नोव्हेंबरला होणाºया महासभेच्या पटलावर ठेवला आहे. इतक्या तातडीने हा प्रस्ताव महासभेकडे पाठवल्याने तो मंजूर होण्याची शक्यता आहे.
टेकाळे यांना राज्य सरकारकडे परत पाठवण्याचा पवित्रा घेण्यात आला असला तरी या अशासकीय प्रस्तावाची कितपत अंमलबजावणी होते, याबाबत मात्र साशंकता आहे. टेकाळे यांच्यावर अकार्यक्षम ठरल्याचा ठपका सर्वपक्षीय सदस्यांनी ठेवला आहे. केडीएमटी उपक्रमाच्या बसताफ्यात वाढ झाली आहे. त्याप्रमाणे उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित होते. परंतु, तसे न होता उपक्रमाचे उत्पन्न घटले आहे, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले आहे. टेकाळे यांच्या हाताखाली काम करणाºया अधिकाºयांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. परिवहनच्या सदस्यांनी मांडलेल्या सूचनांकडे टेकाळे दुर्र्लक्ष करतात. महापौर आणि आयुक्तांच्या आदेशाचेही ते पालन करत नाहीत. त्यांना आपल्या परिवहन उपक्रमात काम करण्यास कोणतेच स्वारस्य नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले. परिवहन समितीच्या शुक्रवारी झालेल्या सभेत याबाबत सदस्यांकडून दाखल करण्यात आलेला प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.