केडीएमटी अधिकच खोलात! , बहुतांश यंत्रणा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:47 PM2017-09-24T23:47:32+5:302017-09-24T23:48:35+5:30
भार्इंदर कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाची दिवसागणिक बिकट अवस्था होत असून देखभाल दुरुस्तीच्या कंत्राटाचे तीनतेरा वाजले असताना कोट्यवधी रुपयांच्या थकीत बिलांपोटी अन्य सुविधाही बंद पडल्या आहेत.
कल्याण : भार्इंदर कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाची दिवसागणिक बिकट अवस्था होत असून देखभाल दुरुस्तीच्या कंत्राटाचे तीनतेरा वाजले असताना कोट्यवधी रुपयांच्या थकीत बिलांपोटी अन्य सुविधाही बंद पडल्या आहेत. त्यातच कार्यशाळाप्रमुख अनंत कदम यांनी दिलेला राजीनामा चर्चेचा विषय ठरला असून दोन दिवसांपूर्वी परिवहनच्या सदस्यांनी अचानकपणे केलेल्या दौ-यात केडीएमटी उपक्रमाचा बेजबाबदार कारभारही चव्हाट्यावर आला आहे.
केडीएमटी उपक्रम सद्य:स्थितीला डबघाईला आला आहे. एकेकाळी सहा ते साडेसात लाखांपर्यंतचे दैनंदिन उत्पन्न आजच्या घडीला साडेतीन लाखांच्या आसपास आले आहे. देखभाल दुरुस्तीअभावी बस नादुरुस्तीचे प्रमाण वाढत असताना आता दुरुस्तीच्या कंत्राटाचे कोट्यवधींचे बिल थकल्याने तसेच कंत्राटाची मुदतही संपुष्टात आल्याने संबंधित कंत्राटदाराने काम करण्यास नकार दिला आहे.
आजमितीला जुन्या १०० बसपैकी ७२ बस बंद आहेत. उरलेल्या २८ बसची छोटीमोठी दुरुस्तीची कामे करणे असतानाही या मार्गावर धावत आहेत. कालांतराने त्याही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत उपक्रमामध्ये दाखल झालेल्या नवीन ११८ बसपैकी ७० बस २ वर्षांपासून आहेत. यातील ४२ बस टायर व इतर सुटे भाग नसल्यामुळे बंद आहेत. सद्य:स्थितीला ७० पैकी केवळ २७ बस धावत आहेत. नुकत्याच दाखल झालेल्या नवीन ४० मिडीबसपैकी ३५ मिडीबसच मार्गावर जाऊ शकतील, अशी अवस्था आहे.
उर्वरित ५ मिडीबस टायर नसल्याने उभ्या आहेत. कंत्राटदाराने काम करणे थांबवल्याने देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेच्या १४ ते १५ कामगारांच्या जोरावर चालवणे अशक्य असून अशा परिस्थितीत उपक्रम लोकाभिमुख सेवा कशी देणार, असा सवाल सदस्यांकडून उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भात सदस्य संतोष चव्हाण यांनी महाव्यवस्थापकांसह महापौर, परिवहन सभापती यांना पत्रव्यवहार करून वास्तवतेकडे लक्ष वेधले आहे. कंत्राटाचा कालावधी संपण्याअगोदर २ महिने नवीन कंत्राटदार नेमण्याची कार्यवाही का करण्यात आलेली नाही. संबंधित कंत्राटदाराशी चर्चा झाली होती का, तो काम करण्यास इच्छुक नसेल तर करारनाम्यातील अटीशर्तीनुसार त्याला नोटीस बजावली होती का, असे विविध सवाल चव्हाण यांनी उपस्थित केले आहेत.यामुळे केडीएमटी पुन्हा एकदा वादाच्या भोवºयात सापडले आहे.
व्यवस्थापक टेकाळे यांच्यावर आणणार अविश्वासाचा ठराव
शुक्रवारी परिवहन सदस्य असलेल्या संतोष चव्हाण, संजय राणे आणि राजेंद्र दीक्षित यांनी अचानक गणेशघाट आगाराला दिलेल्या भेटीत प्रशासनाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आणला. कॅशचा भरणा करण्यासाठी नेलेल्याची नोंद हजेरीवहीवर नसणे, सुरक्षारक्षकांकरवी योग्य प्रकारे झडती न घेणे, बंदावस्थेतील संगणक असे काहीसे चित्र सदस्यांना पाहायला मिळाले.
विशेष बाब म्हणजे वाहकांची जी तपासणी होते, ती देखील होत नसल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. हा सर्व प्रकार पाहताच सदस्यांनी सभापती संजय पावशे यांनाही घटनास्थळी बोलावले. या बेजबाबदार कारभाराबाबत नाराजी व्यक्त करताना व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणणार असल्याची माहिती चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली.
तो राजीनामा घरगुती कारणास्तव
कंत्राटाअभावी बसच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न गंभीर बनला असताना कार्यशाळाप्रमुख अनंत कदम यांनी दिलेल्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी कदम यांनी राजीनामा दिला असून त्यात त्यांनी घरगुती कारणास्तव राजीनामा देत असल्याचे सांगितल्याची माहिती देविदास टेकाळे यांनी दिली. कोणतीही चर्चा न करता रजेवर गेले आणि राजीनामा मेल केल्याचे टेकाळे म्हणाले.