समांतर रस्त्यावरून धावणार केडीएमटी

By admin | Published: July 7, 2017 06:14 AM2017-07-07T06:14:06+5:302017-07-07T06:14:06+5:30

कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्त्यावरून बससेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारच्या

KDMT run on parallel road | समांतर रस्त्यावरून धावणार केडीएमटी

समांतर रस्त्यावरून धावणार केडीएमटी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्त्यावरून बससेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारच्या परिवहन समितीच्या बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर बसअभावी बंद केलेले डोंबिवलीतील मार्ग तातडीने चालू करा, असे आदेशही सभापती संजय पावशे यांनी प्रशासनाला दिले.
ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्त्यावरून परिवहनची बससेवा सुरू करण्यासंदर्भात शिवसेनेचे सदस्य मनोज चौधरी यांनी प्रस्ताव सूचना समितीच्या बैठकीत दाखल केली होती. त्यावर झालेल्या चर्चेदरम्यान कल्याण रेल्वेस्थानक, बैलबाजार, पत्रीपूल, मोहन सृष्टी संकुल, कचोरे गाव, खंबाळपाडा, म्हसोबा चौक, घरडा सर्कल ते डोंबिवली रेल्वे स्थानक या मार्गावर बस सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला.
कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा जवळचा रस्ता म्हणून नागरिक समांतर रस्त्याचा वापर करत आहेत. या रस्त्यालगत मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे येथील रहिवासी या रस्त्यावरून बससेवा सुरू करण्याची मागणी करत होते. त्याची दखल घेत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी सूचनाही या वेळी सदस्यांनी केली.
केडीएमटीतील आयुर्मान संपलेली एक मोठी बस आणि १ मिडी बस टोर्इंग व्हॅनमध्ये परावर्तीत करावी, अशी पावशे यांची प्रस्ताव सूचनाही या वेळी मान्य करण्यात आली. केडीएमटीतील बसचे आयुर्मान साधारण १० वर्षे आहे. ते संपलेल्या बस साधारणपणे नादुरुस्त असतात. केडीएमटीच्या ताफ्यातील अशा नादुरुस्त बसचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे त्यांचा टोर्इंगसाठी वापर करणे कितपत योग्य, अशीही चर्चा आहे.
यासंदर्भात उपक्रमाचे महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित प्रस्ताव हा अशासकीय होता. परंतु, आयुर्मान संपलेल्या, परंतु भंगारात न काढलेल्या अशा बसचा टोर्इंगसाठी वापर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून पुन्हा बैठकीत ठेवला जाईल, असे सांगितले.
परिवहन समितीत मंजूर केल्या जाणाऱ्या ठरावांची ठोस अंमलबजावणी होत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. यासंदर्भात पावशे यांना विचारले असता ते म्हणाले, की येत्या १५ दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी होईल. रेल्वे समांतर रस्ता तसेच बंद असलेल्या मार्गांवर येत्या काही दिवसांत एकतरी बस चालवण्यात येईल.
लाचखोरीच्या प्रकरणात अटक झालेले अधीक्षक राजन ननावरे यांच्यावर न्यायालयात खटला (अभियोग) दाखल करण्यास समितीने मान्यता दिली. ननावरे यांना २७ डिसेंबर २०१६ ला एका कंत्राटी वाहकाकडून सात हजारांची लाच घेताना अटक झाली होती. दरम्यान, पुढील न्यायालयीन कारवाई करण्यासाठी गुरुवारी सक्षम प्राधिकरण असलेल्या परिवहन समितीची मान्यता घेण्यात आली.

बंद केलेले मार्ग तातडीने चालू करा
बसअभावी बंद केलेले डोंबिवलीतील मार्ग तातडीने चालू करणे व सर्व मार्गांवरील बस फेऱ्यांची संख्या वाढवण्याबाबतचा प्रस्ताव मनसेचे सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी मांडला होता. त्यालाही मान्यता देण्यात आली. पी अ‍ॅन्ड टी कॉलनी, गोग्रासवाडी, खंबाळपाडा, नांदिवली, भोपर, नवनीत नगर, लोढा हेवन, महाराष्ट्रनगर, रेतीबंदर, गरीबाचा वाडा या मार्गावर केडीएमटीची बससेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे उपक्रमात नव्याने दाखल झालेल्या बस या मार्गांवर चालवण्यात याव्यात, अशी मागणी म्हात्रे यांनी केली.
डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात सायंकाळी रिक्षा अपुऱ्या पडल्यामुळे तसेच रिक्षावाल्यांच्या मनमानी कारभार व परिवहनच्या बसअभावी २९ जूनला प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली होती. यात प्रवाशांमध्ये मोठा उद्रेक होऊन आंदोलन झाले होते. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बंद केलेल्या मार्गावर पुन्हा केडीएमटी सुरू करावी, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले. याला पावशे व अन्य सदस्यांनी मान्यता दिली.

Web Title: KDMT run on parallel road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.