केडीएमटी, एसटी, वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 05:18 AM2018-11-17T05:18:50+5:302018-11-17T05:19:08+5:30
पत्रीपूल पाडण्यासाठी मेगाब्लॉक : रस्तेवाहतुकीचे नियोजन, प्रवाशांची गैरसोय टाळण्यावर भर
कल्याण : ब्रिटिशकालीन १०४ वर्षे जुना व धोकादायक बनलेला पत्रीपूल रविवारी पाडण्यासाठी मध्य रेल्वे सहा तासांचा विशेष ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे कल्याण ते डोंबिवली रेल्वेस्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नसल्याने रस्तेवाहतुकीवर त्याचा ताण येणार आहे. त्यामुळे ही वाहतूक सुरळीत राहावी तसेच प्रवाशांचे हाल होऊ नये, यासाठी केडीएमटी, एसटी आणि वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे.
मेगाब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली तसेच कल्याण ते कसारा-कर्जतदरम्यान रेल्वेची वाहतूक सुरू राहणार आहे. तर, कल्याण-डोंबिवलीदरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णत: बंद असेल. ब्लॉकचा कालावधी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० असा सहा तासांचा असल्याने या वेळेत प्रवाशांचे मेगाहाल होण्याची शक्यता आहे. पूल पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाची जोरदार तयारी सुरू झाली. मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री घटनास्थळी आणली आहे. अन्य यंत्रणाही या मोहिमेसाठी सज्ज आहेत. केडीएमटी, एसटी महामंडळ, वाहतूक पोलीस, शहर पोलीस या विभागांनी त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांना विशेष सूचना दिल्या आहेत.
पत्रीपूल पाडण्यासाठी मोठमोठ्या व अद्ययावत मशीन आणल्या आहेत. त्या महाकाय मशीन बघण्यासाठी शुक्रवारपासूनच जुन्या पत्रीपूल परिसरात गर्दी होऊ लागली आहे. रविवारी प्रत्यक्षात पूल पाडताना बघ्यांची गर्दी अधिकच वाढणार आहे. याचा फटका नवीन पुलावरून सुरू राहणाऱ्या वाहतुकीलाही बसणार आहे. त्यामुळे पत्रीपूल परिसरात गर्दी होणार नाही, याची दक्षता पोलीस यंत्रणेला घ्यावी लागणार आहे.
रिक्षाचालकांना सूचना
मेगाब्लॉकच्या कालावधीचा रिक्षाचालक मोठ्या प्रमाणात गैरफायदा उठवतात. अव्वाच्या सव्वा भाडे आकारून ते प्रवाशांची अक्षरश: पिळवणूक करतात. यासंदर्भात रिक्षा-चालक-मालक असोसिएशनचे सहसचिव संतोष नवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात प्रवाशांना चांगली सेवा द्या, त्यांच्याकडून जादा भाडे आकारू नका, त्रास होईल असे वागू नका, असे आवाहन रिक्षाचालकांना केल्याचे सांगितले. याबाबतचे फलक रेल्वेस्थानक परिसरातही लावले जाणार असल्याचे ते म्हणाले.
मध्य रेल्वेवरील २४ तासांत १ हजार ७७२ फेºयांपैकी मध्य मार्गावर ८५६ फेºया होतात. मात्र, सुमारे सात तासांच्या ब्लॉकमुळे २०० पेक्षा जास्त लोकल फेºया रद्द होणार आहेत. याचबरोबर, सीएसएमटीकडे येणाºया व जाणाºया एकूण ४३ मेल-एक्स्प्रेसला ब्लॉकचा फटका बसेल. यापैकी १४ मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून, १४ मेल-एक्स्प्रेस कर्जत-पनवेल-दिवा मार्गे मुंबईत दाखल होणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेससह, नागरकोईल, हैदराबाद व अन्य एक्स्प्रेसला रविवारी दिवा स्थानकात अतिरिक्त थांबा देण्यात येईल.
केडीएमटी सोडणार
२५ मोठ्या बस
ब्लॉककाळात प्रवाशांची परवड होऊ नये, यासाठी २५ मोठ्या बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती केडीएमटीचे महाव्यवस्थापक मारुती खोडके यांनी दिली.
नवीन पत्रीपूलमार्गेच या बस चालवल्या जाणार आहेत. परंतु, पूल परिसरात कोंडी झाल्यास विठ्ठलवाडी, चेतना हायस्कूलमार्गे, चक्कीनाका, नेतिवली, टाटा पॉवर कंपनीनाका, बाजीप्रभू चौक, अशा पर्यायी मार्गे बससेवा चालवली जाणार असल्याचे खोडके म्हणाले.
प्रतिसादानुसार एसटीच्याही जादा गाड्या
प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण एसटी आगाराकडूनदेखील जादा बस सोडण्यात येणार आहेत. कल्याण-ठाणे, पनवेल, कसारा, पुणे, नाशिक तसेच कल्याण-डोंबिवली मार्गांवरही बस चालवण्यात येणार आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक प्र.स. भांगरे यांनी दिली. प्रवाशांचा जसा प्रतिसाद मिळेल, तशी गाड्यांमध्ये वाढ केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.