केडीएमटी कर्मचारी : ‘ते’ आदेश कागदावरच, डिसेंबरचा पगार जानेवारीअखेरपर्यंत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:15 AM2018-01-25T01:15:37+5:302018-01-25T01:15:46+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या केडीएमटी परिवहन उपक्रमातील कर्मचा-यांची वेतनाअभावी परवड सुरूच असून जानेवारी महिना संपायला आला, तरी डिसेंबरचे वेतन अद्याप या कर्मचा-यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या केडीएमटी परिवहन उपक्रमातील कर्मचा-यांची वेतनाअभावी परवड सुरूच असून जानेवारी महिना संपायला आला, तरी डिसेंबरचे वेतन अद्याप या कर्मचा-यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही. सहाव्या वेतन आयोगाचे दिले जाणारे थकीत हप्ते गेले दोन महिने मिळालेले नाहीत. सभापती संजय पावशे यांनी पदभार स्वीकारताच महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच प्रशासनाने वेतन अदा करावे, असे आदेश दिले होते. परंतु, या डेडलाइनची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे.
केडीएमटी उपक्रमात सुमारे ६०० कर्मचारी आहेत. वेतन दरमहिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणे अपेक्षित असताना ते महिन्याच्या अखेरीस होण्याची परंपरा कायम आहे. वेतनविलंबाचा मुद्दा वारंवार परिवहनच्या बैठकांमध्ये उपस्थित करण्यात आला आहे.
केडीएमटीला वेतनासाठी केडीएमसीकडून अनुदान मिळते. सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यास केडीएमटीने सुरुवात केली होती. आॅगस्टपासून सुरू केलेली ही थकबाकी दोन महिनेच कर्मचाºयांना मिळाली. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील थकबाकी मिळालीच नाही. या परिस्थितीमुळे कर्मचाºयांमध्ये रोषाचे वातावरण आहे.
केडीएमटी प्रशासनाशी यासंदर्भात संपर्क साधला असता वेतन आयोगाची थकबाकी दिल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु, प्रशासन खोटे बोलत आहे, असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. गुरुवारी तरी वेतन मिळाले पाहिजे. अन्यथा, तीन दिवस सुटी असल्याने अधिकच पंचाईत होणार असल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.
वेतनाला उशीर झाला, ही वस्तुस्थिती आहे. वेतन अनुदानाच्या धनादेशावर आयुक्तांची स्वाक्षरी झाली असून गुरुवारी वेतन कर्मचाºयांच्या खात्यात जमा होईल. सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते देण्यात आले आहेत.
- देविदास टेकाळे, महाव्यवस्थापक, केडीएमटी