केडीएमटी खासगी यंत्रणेद्वारे चालवणार बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:39 AM2021-03-25T04:39:27+5:302021-03-25T04:39:27+5:30
कल्याण : कोरोनाचा फटका केडीएमटीला चांगलाच बसल्याचे उपक्रमाच्या २०२१-२०२२ च्या सादर झालेल्या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत आहे. आयुक्त डॉ. ...
कल्याण : कोरोनाचा फटका केडीएमटीला चांगलाच बसल्याचे उपक्रमाच्या २०२१-२०२२ च्या सादर झालेल्या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी १०५ कोटी ९८ लाख रुपये जमा आणि १०३ कोटी २३ लाख रुपये खर्चाचा, असा २ कोटी ४० लाख रुपये किमतीचा शिलकी अर्थसंकल्प मांडला. २०२० ते आजतागायत कोरोनाचा राहिलेला प्रादुर्भावाचे सावट या अर्थसंकल्पावर आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे वाहतुकीला आणि पर्यायाने उत्पन्नाला आलेल्या मर्यादा पाहता उपक्रमाने खर्च कपातीचे धोरण स्वीकारताना खासगी बाह्य यंत्रणेद्वारे बस चालवून खर्चावर मर्यादा आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
मागील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीला २०२० चा अर्थसंकल्प सादर झाला. पण लागलीच मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने लॉकडाऊन लागू झाले. यात उत्पन्नवाढीसाठी केलेल्या उपाययोजनांवर पाणी फेरले गेले आणि याचा फटका उत्पन्नाला बसला. सोशल डिस्टन्सिंगमुळे वाहतुकीला मर्यादा आल्या आहेत. पर्यायाने उत्पन्नातच घट झाल्याने खर्च कपातीचे धोरण यंदाच्या अर्थसंकल्पात अधोरेखित केले गेल्याचे दिसून आले. २०२१-२०२२ या वर्षात सरकारच्या निर्देशानुसार जीसीसी, एनसीसी, एएमसी या उपलब्ध पर्यायाद्वारे प्रवासी वाहतूक चालवून खर्चावर मर्यादा आणण्याचे धोरण अवलंबिले आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत आयटीएमएस या अंतर्गत ई-तिकिटींग, मोबाईल ॲप, रिअल टाईमिंग वेहिकल ट्रेकिंग सिस्टीम आदी यंत्रणा राबवून प्रवाशांना सुलभ नियमित सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात अत्याधुनिक प्रवासी थांबे यांचाही समावेश आहे.
--------------------------------------------
क्रीडा प्रशिक्षण केंद्र
केडीएमसीतील विद्यार्थ्यांना सरकारच्या राज्य, जिल्हा, विभागस्तरीय स्पर्धेत क्रीडा नैपुण्य प्राप्त होण्यासाठी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण देण्यासाठी मनपातर्फे चांगल्या दर्जाचे क्रीडा प्रशिक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू करणे प्रस्तावित असून, यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा विषयक ज्ञान मिळून त्यांचा क्रीडा विषयक दर्जा उंचावेल व त्याचा त्यांचे व्यक्तिगत विकासासाठी निश्चितच लाभ होईल, असे मत सूर्यवंशी यांनी प्राथमिक शिक्षण विभागावर बोलताना मांडले. महिलांचा व बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सरकारी निर्देशानुसार मनपा क्षेत्रातील महिला व बालकांसाठी विविध योजना राबवण्यासाठी ५ कोटी २३ लाख रुपयांची तरतूद आयुक्तांनी महिला व बाल कल्याण कार्यक्रमांतर्गत केली आहे.
----------------------------------------------