केडीएमटीच्या आगाराला ‘तौक्ते’चा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:41 AM2021-05-19T04:41:51+5:302021-05-19T04:41:51+5:30
कल्याण : खर्च आणि उत्पन्नातील वाढत्या तफावतीमुळे केडीएमटी उपक्रम आधीच डबघाईला आला आहे. दुसरीकडे त्याकडे पालक संस्था असलेल्या कल्याण-डोंबिवली ...
कल्याण : खर्च आणि उत्पन्नातील वाढत्या तफावतीमुळे केडीएमटी उपक्रम आधीच डबघाईला आला आहे. दुसरीकडे त्याकडे पालक संस्था असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. गणेशघाट आगारातील जीर्ण अवस्थेतील कार्यालयांची डागडुजी करण्याची वारंवार मागणी करूनही त्याची अंमलबजावणी केलेली नाही. सोमवारच्या तौक्ते चक्रीवादळाचाही आगाराला तडाखा बसला आहे. कार्यालयांवरील तसेच रॅम्पवरील जुने सिमेंटचे पत्रे वादळात उडून गेल्याने सध्या उपक्रमाला ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा २३ मे १९९९ ला प्रारंभ झाला. तेव्हापासून ते आजतागायत उपक्रमाच्या मुख्य गणेशघाट आगारातील कार्यालयांची डागडुजी करायला प्रशासनाला वेळ मिळालेला नाही. त्यामुळे तेथील कारभार हा धोकादायक अवस्थेतील कार्यालयांतून सुरू असल्याने भविष्यात जीवित हानीही हाेऊ शकते. सोमवारच्या तौक्ते चक्रीवादळात कार्यालयांवरील सिमेंटचे पत्रेच उडून गेले. कर्मचाऱ्यांचा राबता असलेल्या दोन इमारती, सुरक्षारक्षकांची इमारत आणि रॅम्पवरचे पत्रे उडून तेथील काचेचेही नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी परिवहन सभापती मनोज चौधरी, व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत आणि आगार व्यवस्थापक संदीप भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगारात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तात्पुरत्या स्वरूपात ताडपत्री बांधून सध्या कामकाज सुरू केले आहे. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी येथील इमारतीची दुरुस्ती करण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी निधीही मंजूर झाला. पण पुढे कृतीच झालेली नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून, कुणाच्या जिवावर बेतले तरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल सभापती चौधरी यांनी केला आहे.
------------------------------------------------------
सरकारकडून घोर निराशा
दि. २६ व २७ जुलै २००५ ला आलेल्या महापुरात केडीएमटीचा गणेशघाट आगार पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. यात बसगाड्यांसह तेथील मालमत्तेचे सुमारे एक कोटी ८५ लाखांचे नुकसान झाले होते. राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून, पूरपरिस्थितीने नुकसान झालेल्या उपक्रमास आर्थिक साहाय्य मिळण्याबाबत मागणी केली होती. सध्या या महापुराच्या घटनेला १६ वर्षांचा कालावधी उलटूनही उपक्रमाला नुकसान भरपाई मिळालेली नाही. २०१९ च्या जुलै आणि ऑगस्टच्या पूरपरिस्थितीतही आगारातील बसचे नुकसान झाले होते. तेव्हाही इन्शुरन्सवर उपक्रमाची मदार राहिली. यात ३० ते ३५ लाखांचे उपक्रमाचे नुकसान झाले. याशिवाय ३० ते ३५ तिकीट ट्रे पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात तिकिटेही भिजली होती. तेव्हा तेथील ३० फूट उंच असलेल्या संरक्षक भिंतीला मोठे भगदाड पडले होते, तर आगारातील अन्य ठिकाणची १०० फूट लांब संरक्षक भिंतही कोसळली होती.
फोटो आहे