२६ जानेवारीपासून केडीएमटीची डोंबिवलीत रिंगरुट सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:53 PM2017-12-28T16:53:29+5:302017-12-28T16:56:00+5:30
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा परिवहन विभाग कात टाकत असून विविध लोकोपयोगी निर्णय घेण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दिसून येत आहे. त्याचदृष्टीने पुढचे पाऊल म्हणुन २६ जानेवारीपासून शहरात पूर्वेकडे रिंगरुट बससेवा देण्याचा मानस आहे, त्यास डोंबिवलीकर प्रवाशांनीही सहकार्य करावे आणि परिवहन सेवेचा अधिकाधीक लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन सभापती संजय पावशे यांनी केले.
डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा परिवहन विभाग कात टाकत असून विविध लोकोपयोगी निर्णय घेण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दिसून येत आहे. त्याचदृष्टीने पुढचे पाऊल म्हणुन २६ जानेवारीपासून शहरात पूर्वेकडे रिंगरुट बससेवा देण्याचा मानस आहे, त्यास डोंबिवलीकर प्रवाशांनीही सहकार्य करावे आणि परिवहन सेवेचा अधिकाधीक लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन सभापती संजय पावशे यांनी केले.
परिवहनच्या वतीने मानपाडा रोडवरील शंखेश्वर नगर येथे परिवहन बस थांब्याच्या गुरुवारी करण्यात आलेल्या शुभारंभप्रसंगी पावशे बोलत होते. नगरसेविका आशालता बाबर यांच्या मागणीसह पाठपुराव्यामुळे त्या ठिकाणी थांबा करण्यात आला. त्यामुळे नागरिकांची चांगली सोय होणार असल्याचा विश्वास बाबर यांनी व्यक्त केला. बाबर यांनीच शहरात रिंगरुट पद्धतीने बस सेवा असावी अशी मागणी केल्याचे पावशे म्हणाले. त्यानूसार पूर्वेकडील रेल्वे स्थानक-मानपाडा-एमआयडीसी मार्गे पुन्हा रेल्वे स्थानक तसेच रेल्वे स्थानक-मानपाडा- नांदिवली-दत्तनगर- टंडन रोडमार्गे स्वामीविवेकानंद रोड या पट्यातून रेल्वे स्थानक असे दोन रिंगरुट करण्याचा मानस असल्याचा विश्वास पावशेंनी व्यक्त केला. जेणेकरुन नागरिकांना शहरात कुठेही परिवहन बसचा आधार मिळेल, आणि वाहतूकीची गैरसोय होणार नाही. तसेच कोंडीमधून मार्ग निघेल, नागरिकांचा वेळ वाचेल असेही ते म्हणाले. त्यावेळी शिवसेनेचे एकनाथ पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.