केडीएमटीच्या खंबाळपाडा आगाराची सुरक्षा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:32 AM2019-06-04T00:32:24+5:302019-06-04T00:32:30+5:30
दोन अल्पवयीन चोरटे ताब्यात : कचरागाड्यांच्या बॅटऱ्यांमधील केबल चोरण्याचा प्रयत्न
डोंबिवली : ठाकुर्लीनजीकच्या खंबाळपाडा येथील केडीएमटीच्या आगारात उभ्या केल्या जाणाºया कचरागाड्यांमधील सुटे भाग चोरण्याचे प्रकार सुरूच आहेत. गाड्यांच्या बॅटऱ्यांमधील केबल चोरणाºया दोन अल्पवयीन चोरट्यांना सुरक्षारक्षकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केल्याची घटना नुकतीच घडली आहे. तर, काही महिन्यांपूर्वी येथे चोरट्यांनी डिझेल चोरण्याचा प्रयत्न केला होता. अपुरे सुरक्षारक्षक आणि सुविधांची वानवा यामुळे या आगाराची सुरक्षा धोक्यात आली आहे.
खंबाळपाडा परिसरात केडीएमटीच्या आगारासाठी जागा आरक्षित आहे. तेथे केडीएमटीच्या बस उभ्या करण्याचे आणि डिझेलपंप उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, या जागेवर काही वर्षांपासून केडीएमसीच्या कचºयाच्या गाड्या उभ्या केल्या जात आहेत. आगारात पुरेशी वीज नाही. आगारातूनच पाठीमागील वसाहतीत जाण्यासाठी वाट आहे. त्यामुळे सुरक्षा राखणे येथील तुटपुंज्या सुरक्षारक्षकांना जिकिरीचे होते.
दरम्यान, गाड्यांच्या बॅटºया चोरण्याचे प्रकार सातत्याने सुरूच असल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेवरून दिसून आले. १२ आणि १४ वर्षांच्या मुलांनी कचरागाड्यांमधील बॅटरीच्या केबल चोरल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता संजय आव्हाड यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अल्पवयीन चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सुरक्षा अधिकारी रामदास शिंदे यांनी सांगितले. मात्र, सातत्याने घडणाºया घटना पाहता कचºयाच्या गाड्या सुरक्षित नाहीत, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगारामध्ये सीसीटीव्ही बसवणे तसेच सुरक्षारक्षक वाढवण्याची मागणी होत आहे.
आगारातून कचरागाड्या हटवणार तरी कधी?
खंबाळपाडा आगाराची जागा केडीएमटीसाठी आरक्षित आहे. मात्र, तेथे कचºयाच्या गाड्या उभ्या केल्या जात आहेत. कल्याण पूर्वेतील तीन प्रभागांमध्ये कचरा उचलणाºया ४५, तर डोंबिवलीतील चार प्रभागांमध्ये वापरल्या जाणाºया ६० गाड्या येथे उभ्या केल्या जात आहेत.
कचरागाड्या आगारातून तत्काळ हटवा, असे परिवहन सदस्यांनी सातत्याने प्रशासनाला सांगूनही कार्यवाही झालेली नाही.