उद्धवसेनेचे केदार दिघेंविरुद्ध पैसे वाटल्याचा आरोप; अदखलपात्र गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 06:20 AM2024-11-21T06:20:16+5:302024-11-21T06:22:18+5:30
मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी गोरीवले यांच्या ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी असलेल्या मोटारमध्ये दारू आणि प्रत्येकी दोन हजार रुपये भरलेली २६ पाकिटे ठेवून ते मतदारांना वाटण्याच्या प्रयत्नात होते, असा आरोप आहे.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोपरी पाचपाखाडीतून निवडणूक रिंगणात असलेले उद्धवसेनेचे उमेदवार केदार दिघे यांच्याविरोधात दारूच्या बाटल्या आणि पैसे वाटल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती कोपरी पोलिसांनी बुधवारी दिली. पोलिसांनी एका वाहनातून ५२ हजारांची रोकड जप्त केली आहे. केदार दिघे यांनी मात्र सर्व आरोपांचा इन्कार केला आहे.
शिंदेसेनेच्या वर्षा भोसले यांच्या तक्रारीनुसार केदार दिघे, सचिन गोरीवले, प्रदीप शेडगे, रवींद्र शिनलकर यांच्यासह नऊ जण २० नोव्हेंबर, २०२४ रोजी पहाटे १. ४५ ते २ वाजण्याच्या सुमारास कोपरीतील अष्टविनायक चौकात आले होते. त्यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी गोरीवले यांच्या ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी असलेल्या मोटारमध्ये दारू आणि प्रत्येकी दोन हजार रुपये भरलेली २६ पाकिटे ठेवून ते मतदारांना वाटण्याच्या प्रयत्नात होते, असा आरोप आहे.
त्याच वेळी भोसले यांच्यासह शिंदेसेनेच्या उतर कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून कोपरी पोलिसांकडे तक्रार केली. भोसले यांच्या तक्रारीनंतर दिघे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १७४ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरी पोलिसांनी एका वाहनातून मद्याच्या ११ बाटल्या आणि ५२ हजारांची रोकड असा ५४ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रोकड आणि दारू असलेली मोटार ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
या मोटारीमध्ये शासनाच्या वाहनाला असलेला अंबर दिवा मिळाला आहे. गुन्हा दाखल झाला, त्यावेळी कोपरी पोलीस ठाण्यात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सत्ताधारी घाबरले : दिघे
सत्ताधारी घाबरले असून, माझी गाडी मी स्वत:हून पोलिस स्टेशनला नेल्यानंतर तपासणी झाली. त्यामध्ये काहीही सापडले नाही. असे असताना जाणीवपूर्वक माझे नाव गुन्ह्यामध्ये समिविष्ट करून मला लक्ष्य केले जात आहे. कोपरी पाचपाखाडीत ज्यांनी पैशांचा महापूर आणला, जे साड्या वाटप करत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. मात्र, माझी गाडी तपासतानाच्या व्हिडीओत गाडीमध्ये काही सापडले नाही, तरीही जाणीवपूर्वक मंगळवारी रात्रीच्या घटनेनंतर बुधवारी सकाळी गुन्हा दाखल होतो. यामध्ये आपल्याला बदनाम करण्याचा हेतू आहे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार केदार दिघे यांनी सांगितले.