ठामपा तिजोरीत खडखडाट, जनता तुमचा हिशोब लावणार; केदार दिघे आक्रमक
By अजित मांडके | Published: March 5, 2024 03:18 PM2024-03-05T15:18:13+5:302024-03-05T15:18:35+5:30
प्रशासन चालवत असताना आर्थिक नियोजनावर लक्ष देता की दुसऱ्यांच्या तिजोरी भरल्यामुळे पालिकेत खडखडाट आहे असा सवाल दिघे यांनी उपस्थित केला आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून पालिका कर्मचाºयांचे पगार देण्यासाठी महापालिकेने इतर निधी वर्ग केल्याची बाब समोर आली आहे. याच मुद्यावरुन आता उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी पालिका प्रशासनावर बोचरी टिका केली आहे. तिजोरीत खडखडात असतांना देखील इतर गोष्टींवर वारेमाप खर्च सुरु असून ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना इतर गोष्टींवर वारेमाप खर्च सुरू आहे. ठाणे महापालिकेत फक्त ठेकेदारांचे खिसे भरले जात नाही ना? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
आर्थिक वर्ष संपत आले असतांना पालिकेच्या तिजोरीत खडखडाट होत असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले आहे. महापालिकेत अधिकारी, कर्मचाºयांचा पगार देण्यासाठी देखील निधी शिल्लक नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे महुसली कामांना ब्रेक लावून तो निधी कर्मचाºयांचा पगार देण्यासाठी वर्ग करण्यात आला आहे. परंतु त्यामुळे दैनंदिन कामांना त्याचा फटका बसणार आहे. याशिवाय ठेकेदारांची बिले देण्यासाठी देखील पालिकेकडे सध्या निधी नाही. छोट्या ठेकेदारांची बिले थांबविली जात असून मोठ्या ठेकेदारांची बिले केवळ एका फोनवर काढली जात असल्याचेही माहिती देखील पुढे आली आहे. त्यामुळे यासाठी निधी येतो कुठुन असा सवालही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता याच मुद्यावरुन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी पालिका प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत.
प्रशासन चालवत असताना आर्थिक नियोजनावर लक्ष देता की दुसऱ्यांच्या तिजोरी भरल्यामुळे पालिकेत खडखडाट आहे असा सवाल दिघे यांनी उपस्थित केला आहे. हे पैशाचं पाणी नेमकं कुठं मुरतंय.. हे पब्लिक सब जानती हैं. घोडे मैदान लांब नाही जनता तुमचा हिशोब लावणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर ठाणे येथे अतिक्रमण विभागाच्या कारवाई वेळी एका ६५ वर्षीय सर्वसामान्य व्यक्तीचा जीव गेला याला जबाबदार कोण? अनधिकृत बांधकामे सुरू असताना प्रशासन आणि अधिकारी झोपलेले असतात का की लाचेमुळे दुर्लक्ष करतात हे त्यांनी स्पष्ट करावे किंवा आयुक्तांनी राजीनामा द्यावा किंवा अधिकाºयांवर कारवाई करावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.