केडीएमसीच्या रुग्णालयात नव्या ४०० पदांची निर्मिती

By admin | Published: February 8, 2016 02:30 AM2016-02-08T02:30:55+5:302016-02-08T02:30:55+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जेमतेम दोन रुग्णालयांमधील डॉक्टरांची रिक्त ९० पदे भरण्याकरिता राज्य सरकारची मंजुरी मिळण्यास तब्बल नऊ वर्षे लागली आहेत.

Kedmani hospital creates 400 new positions | केडीएमसीच्या रुग्णालयात नव्या ४०० पदांची निर्मिती

केडीएमसीच्या रुग्णालयात नव्या ४०० पदांची निर्मिती

Next

मुरलीधर भवार,  डोंबिवली
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जेमतेम दोन रुग्णालयांमधील डॉक्टरांची रिक्त ९० पदे भरण्याकरिता राज्य सरकारची मंजुरी मिळण्यास तब्बल नऊ वर्षे लागली आहेत. डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ अशी तब्बल ४०० पदांची भरती झाली तरच या रुग्णालयांतील आरोग्य सेवेत श्रेणीवाढ होईल. अन्यथा, या महापालिका क्षेत्रातील नागरिकांना निवासी इमारतीमधील नर्सिंग होम अथवा महागडी इस्पितळे यामध्येच उपचार घ्यावे लागतील, अशी गंभीर परिस्थिती आहे.
केवळ, डॉक्टरांची पदे भरून चालणार नाही. त्यांना हवा असलेला ५० जणांचा पॅरामेडिकल स्टाफ भरणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तयार केला आहे. त्याला प्रशासनाकडून मान्यता मिळाली तरच डॉक्टरांच्या भरतीला पूरक अशी व्यवस्था उभी राहून आरोग्य सेवेला लाभ होईल.
महापालिकेची १३ नागरी आरोग्य केंद्रे असून प्रत्येकी १२० खाटांची क्षमता असलेली डोंबिवलीत शास्त्रीनगर व कल्याणमध्ये रुक्मिणीबाई ही रुग्णालये आहेत. या दोन्ही ठिकाणी डॉक्टर व कर्मचारी संख्येबरोबरच खाटांची संख्या वाढवून प्रत्येकी २०० करण्याचे प्रस्तावित आहे. ही रुग्णालये सुयोग्य आरोग्य सेवा देण्यात कमी पडतात, अशी ओरड वारंवार केली जाते. या रुग्णालयांत विविध विषयांतील तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. प्रसंगी रुग्णांना कळवा येथील शिवाजी सरकारी रुग्णालय, मुंबईतील केईएम, शीव रुग्णालयात पाठविले जाते. उल्हासनगरातील मध्यवर्ती सरकारी रुग्णालयातही धाडले जाते. महापालिकेने २००७ साली रुग्णालयांसाठी आवश्यक असलेल्या ९० डॉक्टरांच्या भरतीचा प्रस्ताव मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यास जून २०१५ उजाडले. आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, या अटीचा भंग होत असल्यास पदास मंजुरी दिली जात नाही. महापालिकेस चार फिजिशियनची गरज असताना प्राप्त अर्जांमध्ये फिजिशियनसाठी एकच अर्ज आला आहे. रेडिओलॉजिस्टसाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या पदांचे काय करायचे, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. डॉक्टरांच्या नव्या भरतीमुळे पालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त ३८ लाख रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.

Web Title: Kedmani hospital creates 400 new positions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.