ऑक्सिजनचा इमर्जन्सी बॅकअप ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:41 AM2021-04-27T04:41:50+5:302021-04-27T04:41:50+5:30
शहरातील खाजगी कोविड रुग्णालयांची महत्त्वपूर्ण बैठक अंबरनाथ नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीला शहरातील सर्व खाजगी कोविड रुग्णालयांतील डॉक्टर ...
शहरातील खाजगी कोविड रुग्णालयांची महत्त्वपूर्ण बैठक अंबरनाथ नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीला शहरातील सर्व खाजगी कोविड रुग्णालयांतील डॉक्टर आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आमदार किणीकर यांनी खाजगी रुग्णालयांतील ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भातील माहिती घेतली. यावेळी सर्वच रुग्णालयांनी ऑक्सिजन पुरवठा अनियमित होत असल्याची तक्रार केली. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने सिलिंडर रिफिल करून दिले जात नसल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिकेला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या संस्थेमार्फत काही प्रमाणात राखीव ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्याची आणि आपत्कालीन परिस्थितीत त्याचा वापर करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन संपल्याचा प्रकार घडल्यास त्यावेळी हा इमर्जन्सी बॅकअप उपलब्ध करून कसा देता येईल, याबाबत पालिका स्तरावर निर्णय घेण्याच्या सूचना किणीकर यांनी दिल्या. सोबतच अंबरनाथ दंत महाविद्यालयातील कोविड रुग्णालयातही ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. यासंदर्भात काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. अंबरनाथ शहराला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या संस्थेमार्फत मुबलक पुरवठा होत असला तरी ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाल्यास शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणार नाही, या अनुषंगाने वाढीव ऑक्सिजन कुठून उपलब्ध होईल, याची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
‘बिल आकारताना माणुसकी दाखवा’
मागणीच्या तुलनेत रेमडेसिविरचा पुरवठा कमी होत असल्याने रुग्णांवर उपचार करताना अडचणी येत असल्याची तक्रार डॉक्टरांनी या बैठकीत उपस्थित केली. त्यामुळे शहरातील खाजगी रुग्णालयांना वाढीव इंजेक्शन कसे उपलब्ध करून देता येईल यावर चर्चा झाली. या बैठकीत काही खाजगी रुग्णालय रुग्णांच्या नातेवाइकांकडून वाढीव बिल आकारत असल्याने या बिलांबाबत संबंधित रुग्णालयांनी मानवतावादी दृष्टिकोनातून काम करण्याच्या सूचना किणीकर यांनी दिल्या.
--------------
फोटो आहेत