कलंकित अन् गुन्हे दाखल असलेल्या नेत्यांना निवडणुकीपासून दूर ठेवा; शिंदे गटाची मागणी

By धीरज परब | Published: March 22, 2024 06:45 PM2024-03-22T18:45:48+5:302024-03-22T18:46:28+5:30

युतीधर्म म्हणून अजूनही आम्ही पदाधिकाऱ्यांनी कोणतेही वक्तव्ये माध्यमांच्या समोर केली नाहीत पण आता अती होत चालले आहे.

Keep tainted and criminally charged leaders out of the election; The demand of the Shinde group | कलंकित अन् गुन्हे दाखल असलेल्या नेत्यांना निवडणुकीपासून दूर ठेवा; शिंदे गटाची मागणी

कलंकित अन् गुन्हे दाखल असलेल्या नेत्यांना निवडणुकीपासून दूर ठेवा; शिंदे गटाची मागणी

मीरारोड - बलात्कार , भ्रष्टाचार , फसवणूक पासून अनेक गुन्हे दाखल असलेल्या दाखलेबाज व चारित्र्यहीन स्वयंघोषित नेत्यास भाजपाने लोकसभा निवडणूक प्रचारा पासून दूर ठेवावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार नरेंद्र मेहतांचा नामोल्लेख टाळत मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री आदींना केली आहे . 

मीरा भाईंदर शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर , महिला जिल्हा संघटक निशा नार्वेकर सह विधानसभा मतदार संघ क्षत्रप्रमुख विक्रमप्रताप सिंह , सचिन मांजरेकर , पूजा आमगावकर यांनी लेखी पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , आमदार प्रताप सरनाईक यांना दिले आहे .  नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्वच उत्सुक असून राज्यातही शिवसेना - भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांची महायुती ४५ हुन अधिक जागा जिंकण्याचा निर्धार करून कामाला लागली आहे. यात आपल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून यावेळेस  महायुतीचाच खासदार निवडून यावा यासाठी शिवसैनिक कामाला लागले आहोत.

युतीचे वरिष्ठ नेते ठाणे लोकसभेत जो उमेदवार देतील त्याला विजयी करण्याची जबाबदारी आमची राहील. लोकसभेच्या जागेबाबत वरिष्ठ नेतृत्व निर्णय घेण्यास सक्षम असताना मीरा भाईंदर मधील वादग्रस्त कलंकीत नेता जाणूनबुजून महायुतीत तणाव निर्माण करणारी आणि जनतेत विरोधाचे वातावरण तयार करणारी वक्तव्ये करीत आहे. तसेच शिवसेना पक्ष व नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करीत असल्याने पत्र लिहिल्याचे कारण नमूद केले आहे . 

भाजपा माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आ. सरनाईक यांच्यावर नामोल्लेख टाळत आरोप - टीका करत शिवसेना उमेदवाराचे काम करणार नाही अशी भूमिका मांडली होती . त्यावरून शिवसेना शिंदे गटाने हे पत्र दिले आहे . कलंकित , भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेला , विविध गंभीर गुन्हे दाखल असलेला, चारित्र्यहीन असा एक वादग्रस्त नेता माध्यमांना मुलाखती देत आहे आणि महायुतीत वाद निर्माण करत आहे. 

भाजपच्या मीरा भाईंदर मधील या नेत्याला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने घरी बसवले. पण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ,  स्वतःच्या वैयक्तिक लालसेपोटी मीरा भाईंदरमधील भाजप पक्ष हा आपली खासगी मालमत्ता असल्यासारखी वक्तव्ये हा नेता करीत असल्याने सगळे शिवसैनिक आणि भाजपचे जुने कार्यकर्तेही नाराज झाले आहेत. युतीधर्म म्हणून अजूनही आम्ही पदाधिकाऱ्यांनी कोणतेही वक्तव्ये माध्यमांच्या समोर केली नाहीत पण आता अती होत चालले आहे. या वादग्रस्त कलंकित नेत्याला भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने आवर घालावा व अशा चारित्र्यहीन लोकांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवावे. जेणेकरून ऐन प्रचाराच्या वेळी कोणताही वाद महायुतीमध्ये समनव्य ठेवताना होणार नाही.

स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी महायुतीत मिठाचा खडा टाकणे म्हणजे नरेंद्र मोदीजी यांनाच विरोध करण्यासारखे आहे. मोदीजी ज्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत त्यांच्याच भाजप पक्षाच्या बॅनरखाली असलेल्या या वादग्रस्त नेत्याकडून अशी चुकीची विधाने होत असल्याने जनतेतही याबाबत उलट सुलट चर्चा होत आहे. अशा वादग्रस्त , कलंकित , आरोपांनी बरबटलेल्या माणसामुळे मीरा भाईंदरचे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. आज असा वादग्रस्त माणूस भाजपचे नेतृत्व करीत असल्याने भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झालेले आहेच पण आता तो जर आमच्या वाट्याला येत असेल तर फारकाळ आम्ही संयम ठेऊ शकत नाही असा इशारा देखील शिंदे गटाने पत्रात दिला आहे . 

Web Title: Keep tainted and criminally charged leaders out of the election; The demand of the Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.