ठेकेदाराच्या बससाठी रक्षक

By admin | Published: October 6, 2016 03:14 AM2016-10-06T03:14:30+5:302016-10-06T03:14:30+5:30

ठाणे परिवहन सेवेत ठेकेदारामार्फत चालवण्यात येणाऱ्या बसमध्ये किती प्रवासी घ्यायचे यावर नियंत्रण ठेवण्याकरिता सॅटीसवर दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केल्याची

Keeper for the contractor's bus | ठेकेदाराच्या बससाठी रक्षक

ठेकेदाराच्या बससाठी रक्षक

Next

ठाणे : ठाणे परिवहन सेवेत ठेकेदारामार्फत चालवण्यात येणाऱ्या बसमध्ये किती प्रवासी घ्यायचे यावर नियंत्रण ठेवण्याकरिता सॅटीसवर दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केल्याची धक्कादायक बाब बुधवारी परिवहन समितीच्या बैठकीत उघड झाली. ठेकेदाराचे हे सुरक्षा रक्षक बसमध्ये किती प्रवासी चढणार ते ठरवतात. सकाळी कार्यालयीन घाईगर्दीच्यावेळी एखाद्याने या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला खाली उतरवतात, असा आरोप सदस्यांनी केला.
ठाणे परिवहन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे सदस्य तकी चैऊलकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ठाणेकरांना चांगली सेवा मिळावी म्हणून परिवहन सेवेत, जेएनएनयुआरएम अंतर्गत पहिल्या टप्यात १९ बस दाखल झाल्या आहेत. परंतु काही दिवसांतच या बस बंद पडण्याचे प्रमाण वाढल्याचे पडसाद बैठकीत उमटले होते. त्यानंतर आता या बसमध्ये किती प्रवाशांनी बसायचे हे ठेकेदारांचे सुरक्षा रक्षक ठरवणार का, असा सवाल सदस्यांनी केला. ५५ ते ६० प्रवासी बसमध्ये चढल्यानंतर त्यापेक्षा अधिक प्रवाशांना बसमधून कशाकरिता खाली उतरविले जाते ? या ठेकेदाराचे आणखी किती चोचले पुरवयाचे, असे सवालही त्यांनी केले. तर ठेकेदाराला चालवायला दिलेल्या बसमध्ये ठराविक प्रवासी आणि परिवहनकडून चालवण्यात येणाऱ्या बसमध्ये रेटून रेटून प्रवासी कशासाठी भरतात, असा सवाल सदस्य राजेश मोरे यांनी उपस्थित केला. परिवहनच्या बसगाड्यांनाही सुरक्षा रक्षक देण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या बस केवळ घोडबंदर भागाकरिता सोडल्या जात आहेत, याकडे चेऊलकर यांनी लक्ष वेधले. समस्त ठाणेकर हे कर भरत असतांना ही सेवा बाहेरील प्रवाशांसाठी कशासाठी असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. केवळ या भागात नव्याने विकासकामे होत असल्यानेच त्यांच्या दिमतीला या बस दिल्या आहेत का, असा खडा सवाल चेऊलकर यांनी केला. ही सेवा सर्व ठाणेकरांसाठी उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणीही त्यांनी लावून धरली. (प्रतिनिधी)

Web Title: Keeper for the contractor's bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.